मोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मंचर येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात शिक्षणासाठी दररोज थुगाव येथून ये-जा करते. मंगळवारी (ता. 23) 400 रुपये देवून मंचर बस स्थानकातून एसटीचा पास घेतला आहे.
- काजल अशोक थोरात, विद्यार्थिनी, थुगाव (ता. आंबेगाव)

मंचर (पुणे): अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी, असे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयांना शुक्रवारी (ता. 12) रोजी पाठविले आहे. त्यामुळे मुलींना मोफत प्रवासाच्या योजनेचा मार्ग खुला झाला आहे. पण अजून आदेश बसस्थानकापर्यंत न पोचल्याने पैसे देवूनच प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थिनींमध्ये नाराजी आहे.

गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील निर्णयानुसार 15 ऑक्‍टोबरपासून मोफत प्रवास करता येईल, अशी विद्यार्थिनींची अपेक्षा होती. दरम्यान मंगळवारी (ता. 23) अनेक विद्यार्थिनींनी मंचर बस स्थानकात मोफत प्रवास मागणीबाबत चौकशी केली. पण अजून आमच्यापर्यंत आदेश पोचलेले नाहीत. त्यामुळे आमचा नाइलाज आहे, असे वाहतूक नियंत्रक यांनी सांगितले.

वैशाली सुरेश लोखरे या विद्यार्थिनीने 200 रुपये, कोल्हारवाडीच्या वैष्णवी शिवाजी गावडे या विद्यार्थिनीने 500 रुपये देवून एसटीचा पास घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबतच्या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करावी, अशी मागणी शीतल संदीप हिंगे, मयूरी संतोष एरंडे व मोनिका रंगनाथ चासकर या विद्यार्थिनींनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl student is still deprived of free ST journey pass