esakal | युवतींच्या हाती एसटीचे "स्टेअरिंग'
sakal

बोलून बातमी शोधा

बालगंधर्व रंगमंदिर - एसटी महामंडळातील बसचालक पदासाठी 163 महिला-युवतींना प्रशिक्षण देऊन संधी देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ प्रतिभा पाटील, दिवाकर रावते, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाला.

शस्त्रांचा परवाना अन्‌ घराजवळ ड्यूटी
युवतींना चालक म्हणून संधी दिलीत पण, त्यांना घराजवळ ड्यूटी द्या, त्यांची सुरक्षितता जोपासा, त्यांना पुरेशा सुविधा द्या, अशी सूचना माजी राष्ट्रपती पाटील यांनी केली; तर या चालक युवतींना आवश्‍यकतेनुसार शस्त्रपरवानाही द्या, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

युवतींच्या हाती एसटीचे "स्टेअरिंग'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

163 जणींच्या प्रशिक्षणास सुरवात; चालक म्हणून संधी
पुणे - राज्याच्या विविध भागांतील 163 युवतींना एसटी महामंडळात बसचालक म्हणून नोकरी मिळावी, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमास शुक्रवारी येथे प्रारंभ झाला. देशात पहिल्यांदाच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये युवतींना चालक म्हणून संधी मिळणार आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात युवतींना नियुक्तिपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहनमंत्री दिवाकर रावते होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपच्या शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ, एसटी मंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक कॅप्टन राजेंद्र सनेल-पाटील, महामंडळाचे सरव्यवस्थापक माधव काळे उपस्थित होते. एसटी महामंडळाचे कर्मचारी दत्तात्रेय गायकवाड यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. 2017 व 2018 मध्ये विशेष कामगिरी केलेल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

पाटील म्हणाल्या, 'एसटी महामंडळाच्या विविध योजना समाजासाठी उपयुक्त आहेत. महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळाने त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हे पाऊल अत्यंत धाडसी असून ते यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. महामंडळाचा हा उपक्रम देशासमोर नवा आदर्श निर्माण करेल.''

परिवहनमंत्री रावते म्हणाले...
- एसटीच्या दहा हजार कर्मचाऱ्यांची पुण्यातील व्हिजन नेक्‍स्टमार्फत नेत्रतपासणी होणार
- 55 वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे सर्व लाभ देण्याबरोबरच दहा लाख रुपये देणार
- निवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नीसाठी 65 वर्षांपर्यंत मोफत प्रवासाची सवलत
- महिला चालकांची संख्या पुढील काही वर्षांत किमान दहा हजार करणार

महिला चालकांसाठी नियम शिथिल...
चालकपदासाठी अवजड वाहनचालक परवाना व त्यानंतर तीन वर्षांचा अनुभव या अटी शिथिल करून एक वर्ष हलके वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या युवती-महिलांना संधी देण्यात येत आहे.

त्यांच्यासाठी उंचीची अट शिथिल केली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यांत ही योजना राबविली असून 932 महिला उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 743 उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या व 163 अंतिम प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या. त्यांना एक वर्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चाचणीनंतर त्यांना नियुक्ती देण्यात येईल.

loading image
go to top