सर्वसामान्यांना सन्मानाची वागणूक द्या : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

इंदापूर : ""सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. सरकारी कार्यालयातून सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे ही काळाची गरज आहे,'' असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

इंदापूर : ""सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. सरकारी कार्यालयातून सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे ही काळाची गरज आहे,'' असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. 

महसूल विभागाच्या इंदापूर येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाळा भेगडे, बाळासाहेब गावडे, माउली चवरे, मारुतराव वणवे, नानासाहेब शेंडे, माउली वाघमोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई उपस्थित होते. इमारतीचे बांधकाम करणारे ओंकार कन्स्ट्रक्‍शनचे प्रतिनिधी रवी सिंदगे यांचा सत्कार करण्यात आला. 

बापट म्हणाले, ""प्रशासकीय भवन नागरिकांना मार्गदर्शक मंदिर वाटले पाहिजे. अधिकाऱ्यांनी सर्वांना हो, तर पुढाऱ्यांनी कायद्याबाहेरचे काम असेल तर नाही म्हणण्यास शिकले पाहिजे. अधिकाऱ्यांनी राजकारणात हस्तक्षेप करू नये, तर पुढाऱ्यांनी टीका नेहमी सकारात्मक पद्धतीने घ्यावी. या इमारतीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्राथमिक योगदान दिले असल्याने त्यांना कार्यक्रमास बोलाविण्यास माजी काहीही अडचण नव्हती.'' 
जो सरळ मार्गाने काम करतो, त्याने जगाच्या रहाटगाडग्याचा विचार करू नये, असा सल्ला त्यांनी आमदार भरणे यांना दिला. 

भरणे म्हणाले, ""जुन्या तहसील कार्यालयात योग्य सुविधा नव्हत्या. नवीन प्रशासकीय इमारतीचा फक्त सांगाडा होता. आमदार झाल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री बापट यांच्याकडून 10 कोटी, तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पाच कोटी रुपये आणून या इमारतीचे काम पूर्ण केले. तालुक्‍याच्या विकासासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पालकमंत्री बापट यांची मदत होते.

बावडा आरोग्य केंद्रासाठी 12, तर भिगवण ड्रामा सेंटरसाठी 17 कोटी रुपयांचा निधी दिला. पाटबंधारे अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे काही गावे आवर्तनापासून वंचित राहिली. या गावांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांना बापट यांनी योग्य आदेश द्यावा.'' 

तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी स्वागत, प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी प्रास्ताविक, रामभाऊ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बांधकाम विभागाचे उपअभियंता धनंजय वैद्य यांनी आभार मानले.

Web Title: Give Honor to the common people says Girish Bapat