esakal | ‘बूस्टर’ आधी किमान पहिला डोस द्या : डॉ. बाळ | pune
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine

पुणे : ‘बूस्टर’ आधी किमान पहिला डोस द्या : डॉ. बाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना प्रतिबंधक लशीचा तिसरा बूस्टर डोस हवाच, अशी आग्रही मागणी होत आहे. पण, त्यात लशीची उपलब्धता महत्त्वाची ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे बहुतांश जणांना किमान पहिला डोस मिळाला पाहिजे. त्यानंतर आरोग्य सेवकांच्या बूस्टर डोसचा विचार व्हावा, असा एक मतप्रवाह आता पुढे येत आहे.

आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा तिसऱ्या डोसची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर इम्युनोलॉजिस्ट विनिता बाळ यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. डॉ. बाळ म्हणाल्या, ‘‘तिसरा डोस हवा की नको याचे ‘हो’ किंवा ‘नाही’ असे एका शब्दामध्ये उत्तर देणे शक्य नाही. प्रत्येक आरोग्य सेवकाचा जीव महत्त्वाचा आहेच. पण, लसीकरणाने इतरांच्या जिवाचा धोका कमी झाला, म्हणजे इतरांना संसर्गाचा धोका कमी झाल्यास आरोग्य सेवकांना होणाऱ्या संसर्गाची शक्यता आणखी कमी होते.’’

हेही वाचा: Alert! आणखी चार-पाच दिवस हैद्राबादमध्ये पावसाचा जोर

तिसरा डोस नेमका कोणाला?

आपण ज्या वेळी आरोग्य सेवक म्हणतो त्यात फक्त डॉक्टर आणि परिचारिका यांचा थेट रुग्णांशी संपर्क येत असतो. त्यातही कोरोनाच्या वॉर्डमध्ये रुग्णसेवा करणाऱ्यांचा सातत्याने रुग्णांशी संपर्क येतो. अशा आरोग्य सेवकांना परत-परत संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचा रुग्णसेवेशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे तिसरा डोस द्यायचा, तर नेमक्या आरोग्य सेवकांना दिला पाहिजे. त्यात हे स्पष्ट असले पाहिजे.

‘बूस्टर’ची आवश्यकता लगेच का नाही?

लशींचे दोन्ही डोस घेतलेले असतील आणि त्यानंतर रुग्णसेवेच्या निमित्ताने संसर्ग होत असल्यास आपल्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग झाल्यास त्याला विरोध करण्याची प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात विकसित होते. त्यामुळे एका बाजूला तिसऱ्या बूस्टर डोसची तातडीने आवश्यकता नाही, असा एक मत प्रवाह असू शकतो. विषाणू स्वतःमध्ये सातत्याने बदल करतो. ती त्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे भविष्यात परत विषाणूंमध्ये बदल झाला, तर ‘हाय रिस्क’ आरोग्य सेवकांना धोका असतो.

लसीकरणाने संसर्गाचे गांभीर्य वाढत नाही?

कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोना संसर्ग झाला, तरीही त्याचे गांभीर्य वाढलेले नाही. त्यापैकी खूप कमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. ऑक्सिजन लागणाऱ्यांची संख्या यापेक्षा कमी आहे. तसेच, मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण सर्वांत कमी आहे.

लशीचा मुबलक साठ्याची गरज

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. स्पुटनिकची लसही मिळत आहे. झायडस कॅडिलाच्या लशीलाही ऑगस्टमध्ये मान्यता मिळाली आहे. पण, अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाही. पण, पुढच्या काही महिन्यांमध्ये या लस नागरिकांना मिळतील. या पार्श्वभूमिवर आरोग्य सेवकांना आणखी एक बूस्टर डोस दिल्यास त्यातून निश्चित तोटा होणार नाही. पण, त्यासाठी लशीचा मुबलक साठा उपलब्ध असला पाहिजे. कारण, अद्यापपर्यंत सगळ्यांना अजूनही लशीचा पहिला डोस मिळालेला नाही. जानेवारी ते मार्चपर्यंत आरोग्य सेवकांचे दोन डोस झाले. त्याला आता सहा महिने झाले आहेत. या कालावधीत विशेषतः तरुणांमधील रोग प्रतिकारक शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात कमी होत नाही.

loading image
go to top