Alert! आणखी चार-पाच दिवस हैद्राबादमध्ये पावसाचा जोर

hydrabad flood.
hydrabad flood.

हैद्राबाद: आंध्राच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मागील आठवड्यापासून तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका तेलंगणाची राजधानी हैद्राबादला बसला आहे. या अतिवृष्टीने तेलंगणात जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्याही हैद्राबादमधील कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. अशातच भारतीय हवामान खात्याने (IMD) हैदराबादमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

दिवसेंदिवस हैद्राबादमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सगळे रस्ते पाण्यात बुडाले आहेत. जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी आहे. IMDच्या माहितीनुसार हैदराबादमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येणाऱ्या आठवड्यातील मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 

तेलंगणाचे महानगर आणि नगरविकास मंत्री केटी रामराव सातत्याने पूरग्रस्त भागाचा दौरा करून अधिकाऱ्यांना सुचना देत आहेत. बचाव पथक गरजूंना खाद्यपदार्थांची पाकिटे आणि औषधांचे वाटप करत आहेत. राजेंद्रनगर भागात नुकत्याच आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राव यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी साडेआठ ते रात्री दहा या वेळेत मेडचल मल्काजगिरी जिल्ह्यातील सिंगापूर टाऊनशिपमध्ये 157.3 मिमी तर उप्पलजवळील बांदालगुडा येथे 153 मिमी पाऊस पडला होता. तसेच हैद्राबाद शहराच्या इतर अनेक भागातही मुसळधार पाऊस कोसळला.

गाड्या वाहून गेल्या
पावसामुळे जुन्या हैदराबादेत पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर पाणी आल्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, गाड्या त्याबरोबर वाहत गेल्या.

हजारो एकर शेत पाण्याखाली
राज्यात हजारो एकर शेत पाण्याखाली गेले. एनडीआरएफ आणि लष्कराला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. लष्कराने बंदलगुडा भागात मदतीसाठी तुकडी रवाना केली. एनडीआरएफने हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यात एक हजाराहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी आणि गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आली. 

पाच हजार कोटींचे नुकसान
दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे तेलंगण राज्याचे सुमारे ५ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले. त्यामुळे केंद्र सरकारने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी १३५० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com