"ताप, खोकला, उलट्या होताच सुरू करा स्वाइन फ्लूची औषधे' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पुणे - "ताप, सर्दी, खोकला, उलट्या अशी प्रमुख लक्षणे दिसताच इतर उपचारांमध्ये वेळ न घालवता अवघ्या दोन दिवसांमध्ये स्वाइन फ्लूची औषधे सुरू करावीत,' अशी सूचना खासगी डॉक्‍टरांना सोमवारी करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूची औषधे आणि प्रतिबंधात्मक लस महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध असल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुणे - "ताप, सर्दी, खोकला, उलट्या अशी प्रमुख लक्षणे दिसताच इतर उपचारांमध्ये वेळ न घालवता अवघ्या दोन दिवसांमध्ये स्वाइन फ्लूची औषधे सुरू करावीत,' अशी सूचना खासगी डॉक्‍टरांना सोमवारी करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूची औषधे आणि प्रतिबंधात्मक लस महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध असल्याचेही आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या शहरात वेगाने वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर स्वाइन फ्लूचे निदान, उपचार आणि काळजीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खासगी डॉक्‍टरांची बैठक बोलविण्यात आली होती. त्याच्या पहिल्या टप्प्यात कोथरूड, वारजे माळवाडी, घोले रस्ता या भागातील जनरल प्रॅक्‍टिशनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नागनाथ रेड्डीवर यांनी मार्गदर्शन केले. स्वाइन फ्लूच्या उपचारांसाठी केलेल्या वर्गवारीची माहिती या वेळी डॉक्‍टरांना देण्यात आली. 

डॉ. परदेशी म्हणाले, ""स्वाइन फ्लूच्या उपचाराबद्दल खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्‍टरांना सविस्तर माहिती देण्यासाठी ही बैठक बोलावली होती. आतापर्यंत स्वाइन फ्लूची लक्षणे असणाऱ्या रुग्णावरच लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यापुढे जाऊन अशा रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी रुग्णांनी आणि संपर्कात येणाऱ्यांनी डॉक्‍टरांकडे नियमित पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. याबाबत डॉक्‍टरांनीच रुग्णांना आणि नातेवाइकांना आवाहन करावे.'' 

जनरल प्रॅक्‍टिशनर्सची भूमिका महत्त्वाची 
डॉ. आवटे म्हणाले, ""स्वाइन फ्लूच्या रुग्णावर दोन दिवसांमध्ये प्रभावी उपचार सुरू होणे आवश्‍यक आहे, त्यामुळे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णाला स्वाइन फ्लूची लक्षणे असल्यास त्यावर तातडीने योग्य उपचार झाले पाहिजेत. त्यासाठी जनरल प्रॅक्‍टिशनर्सची भूमिका महत्त्वाची आहे.'' 

स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांत मोफत उपलब्ध आहे. मधुमेह, हृदयविकार, गर्भवती या आणि असे काही आजार असलेल्या रुग्णांसाठी ही लस प्राधान्याने देण्यात येणार आहे. 
- डॉ. एस. टी. परदेशी, प्रमुख, आरोग्य विभाग 

Web Title: Give Swine flu drugs