हरित पुणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

पुन्हा हिरव्यागार उत्सवाकडे वळूया!
संयुक्त राष्ट्रांचे या वर्षीचे पर्यावरण दिनाचे ब्रीद आहे ‘वायुप्रदूषण’. पंचतत्त्वातील पाचही तत्त्वे एकमेकांशी घट्ट बांधली गेली आहेत. त्यातील एक प्रदूषित झाल्यास त्याचा परिणाम इतर चारांवरही होतो. त्यामुळे मानवाने आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेत सर्व उत्सव ‘धूरमुक्त’ साजरे करायला हवेत.

पुणे - पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती. त्यामुळे २७१ दिवस पुणे ‘ग्रीन’ असा निष्कर्ष भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम) ‘सफर’ या प्रकल्पातून निघाला आहे.

पुण्यासह दिल्ली, मुंबई, अहमदाबाद येथील हवेची गुणवत्ता ‘सफर’तर्फे सातत्याने मोजली जाते. त्याच्या गेल्या वर्षीच्या विश्‍लेषणातून ही माहिती पुढे आल्याचे प्रकल्पाचे प्रमुख डॉ. गुफरान बेग यांनी सांगितले.

पुण्यातील हवाप्रदूषण
सल्फर संयुगे, नायट्रोजन संयुगे, धूलिकण (पी. एम. १०), अतिसूक्ष्म धूलिकण (पी. एम. २.५), कार्बन मोनॉक्‍साईड यातून शहरातील हवा प्रदूषित होते. 

सल्फर संयुगे - लाकूड, कोळसा, पेट्रोलियम पदार्थाच्या ज्वलनातून सल्फर संयुगे बाहेर पडतात. यात सल्फरडाय ऑक्‍साईडचे प्रमाण सुमारे ८० टक्के असते. पुण्यातील खासगी वाहनांची संख्या हे हवेतील प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण आहे. याचे हवेतील प्रमाण ५० मिली ग्रॅम प्रतिघन मीटरपेक्षा जास्त नसावे. पण, प्रत्यक्षात हडपसर येथे ही पातळी ६० मिलिग्रॅम प्रतिघन 
मीटरपेक्षा जास्त नोंदली गेली आहे.

नायट्रोजन संयुगे - वाहनांमधून उत्सर्जित होणारा हा वायू आहे. हवेतील त्याचे प्रमाण ४० मिलिग्रॅम प्रतिघन मीटरपेक्षा जास्त नसावे. पण, पुण्यातील नवी पेठ, हडपसर आणि मंडई येथे गेल्या सहा वर्षांपासून या वायूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. हा वायू श्‍वसनावाटे शरीरात गेल्याने फुफ्फुसांना सूज येऊन, त्यांचे कार्य मंदावण्याचा धोका असतो.

धूलिकण (पीएम १०) - इंधनाचे ज्वलन, बांधकामे, रस्त्याच्या कडेची धूळ यातून हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढते. वाऱ्यामुळे हे धूलिकण एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जातात. पावसाळ्यात पुण्यात धूलिकणांचे प्रमाण कमी होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील ‘पीएम १०’चे प्रमाण ६० मायक्रॉन प्रतिघन मीटरपेक्षा जास्त नसावे. पण, पुण्यात हे प्रमाण सातत्याने सरासरीपेक्षा जास्त नोंदले आहे. 

अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) - वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरामध्ये ‘नॅनो’ आकारातील काजळीसारखे कण असतात. ते कण एकत्र येऊन अतिसूक्ष्म धूलिकण तयार होतो. हवेतील त्याचे ४० मायक्रॉन प्रतिघन मीटरपेक्षा जास्त नसावे. पुण्यात हे प्रमाण ६५ मायक्रॉन प्रतिघन मीटर असल्याचे नोंदले गेले आहे.

सूक्ष्म धूलिकण म्हणजे काय?
‘पीएम १०’ म्हणजे १० मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण. एक मिलिमीटरचा एक हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन.

अतिसूक्ष्म धूलिकण म्हणजे काय?
‘पीएम २.५’ याला अतिसूक्ष्म धूलिकण म्हटले जाते. त्यांचा आकार २.५ मायक्रॉनपर्यंत असतो.

वाहनांची वाढती संख्या
पुण्याची वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोंडीत अडकत असलेली आपण पाहतोय. ‘अशक्त’ झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि त्याला पर्याय म्हणून उभी राहणारी खासगी वाहनांची संख्या ही वाहतूक व्यवस्थापनातील सर्वांत मोठी डोकेदुखी ठरतेय आणि हेच शहरातील हवा प्रदूषित होण्यामागचे प्रमुख कारण म्हणून समोर येतेय. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात मार्च २०१६ मध्ये ३१ लाख सात हजार ९६२ वाहनांची नोंद झाली होती. अवघ्या वर्षभरात ही संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० झाली. तर, उच्चांकी मार्च २०१८ मध्ये ३६ लाख २७ हजार २८० नोंद झाली. त्यात दुचाकींचे प्रमाण २७ लाख तीन हजार १४७ नोंदली गेली आहे. चारचाकी वाहनांची संख्या ८ लाख ७० हजार ९०६ पर्यंत असून, ५३ हजार २२७ रिक्षा आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Global Environment Day Green Pune