esakal | वाळकी-पिराचीवाडी बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी, एक मेंढी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या

वाळकी-पिराचीवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी, एक मेंढी ठार

sakal_logo
By
संतोष काळे ः सकाळ वृत्तसेवा

राहू : वाळकी - पिराचीवाडी (ता. दौंड) येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेतमजूर अनिल कांबळे यांच्या घराजवळ घोट्यात बांधलेल्या एक घाबन शेळी, एका बकरीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे जागीच मृत्युमुखी पडल्या. कांबळे यांनी नुकसानभरपाईची मागणी वन विभागाकडे केली आहे .घटनास्थळी वनरक्षक सुरेश पवार, वनपाल सुनिता शिरसाट, जी.एन. पवार यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला आहे.

वाळकी - पिराचीवाडी परिसरात भरदिवसा बिबट्या आणि दोन बछडे वावरतांना अनेक नागरिकांना दिसल्याने घबराट पसरली आहे. असे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोरात, सरपंच ज्योती जनार्दन थोरात, उपसरपंच सुरेश कदम यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

या परिसरात गेल्या महिन्यापासून बिबट्याचा भर दिवसा वावरामुळे मोठी दहशत निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात येथील शेतकऱ्यांच्या मेंढ्या व शेळ्या, पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केले होते .दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचे वाढते हल्ले ही चिंताजनक बाब बनल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात भयभीत होऊ लागले आहे. या परिसरात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोरात, सरपंच ज्योती थोरात, उपसरपंच सुरेश कदम, प्रविण थोरात, ग्रामपंचायत सदस्य अमोल थोरात , किशोर कदम, संजय कुदळे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलदादा थोरात, पोलीस पाटील निलखंठ थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. मात्र पिंजरा लावण्यास वन विभागाकडून सोईस्कर टाळाटाळ केली जात असल्याचे येथील संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.

या परिसरात शेतात काम करत असताना यापूर्वी येथील नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्या संदर्भात वन विभागाकडे वारंवार निवेदन विनंती करूनही वन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असतात. असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: महाविद्यालये सुरू होण्याची तारीख ठरली, असे असतील नियम

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामपंचायतीने त्वरित कागदपत्रांची आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पूर्तता करावी . दोन दिवसात परिसरात तातडीने पिंजरा लावला जाईल असे आश्वासन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. नागरिकांनी सतर्क राहावे. रात्री अपरात्री शेतात न जाण्याचा सल्ला दिला. घरा भोवताली विजेचे दिवे चालू ठेवा. अधून-मधून फटाके वाजवा असे आव्हान वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

दोन दिवसात पिंजरा न लावल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण केला जाईल.. ! आम्ही वनविभागाकडे पिंजरा लावण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील वन विभाग चालढकल करत दुर्लक्ष करत आहे. जीवितहानी झाल्यावरच वन विभागाला जाग येणार का..? दोन दिवसात या परिसरात पिंजरा न लावल्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार घातला जाईल असा इशारा येथील संतप्त ग्रामस्थांनी 'सकाळ'शी बोलताना दिला.

loading image
go to top