देवासाठी खर्च केलेले तरी पैसे द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

भवानीनगर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामी गावांमध्ये करावयाच्या सुविधांचे अनुदान राज्य सरकार दरवर्षी देते. सरकारवर भरवसा ठेवून ग्रामपंचायती तो खर्च करत असतात. या वर्षी मात्र पालखीचा मुक्काम उलटून सहा महिने उलटून गेले तरी अनुदान ग्रामपंचायतींना मिळालेले नाही. आपण किमान देवाला खर्च केलेले तरी पाठीमागे ठेवत नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाने अगोदर खर्च करायला लावला व आता हात वर केले आहेत, हे बरे नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

सणसर ग्रामपंचायतीने केलेला ३.२५ लाखांचा खर्च अद्याप मिळालेला नसल्याने गावच्या कारभाऱ्यांनी सोमवारी (ता. २२) जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने यांची भेट घेतली व त्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या अनुदानाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी गळ घातली. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना गाव कारभाऱ्यांनी दिलेले निवेदन माने यांच्याकडे सुपूर्त केले. 

या संदर्भात माने यांनी सणसरच्या सरपंच माधुरी पाटील, सदस्य श्रीनिवास कदम, यजुवेंद्रसिंह निंबाळकर, शरद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर भोईटे, यशवंत पाटील यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी, अनेक गावांचे अनुदान थकीत असून, प्रशासन पातळीवरून अद्याप त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे माने यांच्या निदर्शनास आणून दिले. माने यांनी, यासंदर्भात तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. 

दरम्यान, यासंदर्भात गावच्या पदाधिकाऱ्यांनी, पाठीमागील मुक्कामात केलेल्या खर्चाची बिले अद्याप रखडली आहेत. ज्यांनी कामे केली, त्यांनी पैशासाठी लकडा लावलेला असून, अनुदान मिळाले नसल्याने पुढील वर्षी काय उत्तरे द्यायची, हा प्रश्न उभा राहिल्याची चिंता व्यक्त केली.

Web Title: God Expenditure Money Grampanchyat