...म्हणून ग्राहकांची सोन्याला पसंती; सराफ बाजाराला पुन्हा झळाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

  • सराफ बाजाराला पुन्हा झळाळी 
  • लाग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी ग्राहकांची सोन्याला पसंती 

पुणे : गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. भाव तेजीत असून देखील लग्नसराई आणि येत्या वर्षभरात आणखी भाव वाढण्याची शक्‍यता विचारात घेऊन सोन्याला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सराफ बाजाराला पुन्हा झळाळी येऊ लागली आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मार्च महिन्यात पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर 23 मार्च पासून पुण्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी शहरातील बाजार पेठ काही अटी व शर्तीवर खुली झाली. दिवसाआड, वारंवार बदलणारी दुकानांची वेळ एकीकडे ही परिस्थिती, तर दुसरीकडे ग्राहकांच्या चिंतेत सराफ व्यावसायिक होते. परंतु गेल्या काही दिवसात हे चित्र बदलत चालले आहे. सोन्याच्या बाजाराला ग्राहकांच्या रूपाने पुन्हा झळाळी येऊ लागली आहे. 
-------------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा
-------------
त्यातच जानेवारीपासून सोन्याच्या दरात जवळपास तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली. असे असतानाही सराफ बाजारात पुन्हा ग्राहकांची वर्दळ हळूहळू वाढू लागली आहे. लग्नसराई आणि येत्या वर्षभरात सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता विचारात घेऊन ग्राहकांचे पावले या बाजाराकडे वळू लागल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. 

पी.एन. गाडगीळ ऍण्ड सन्सचे संचालक आणि इंडियन बुलीयन ज्वेलर्स असोसिएशनचे पुणे विभागाचे अध्यक्ष अमित मोडक म्हणाले,"" गेल्या काही महिन्यांत इटीएफ गोल्ड आणि सोन्याच्या रोख्यांमध्ये झालेली गुंतवणूक पाहिली, तर ती काही हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. कारण येत्या वर्षभरात सोने-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून सोन्याला मागणी वाढली आहे. तसेच लग्नसराईमुळे देखील मागणीत वाढ झाली आहे. परिणामी मार्केट हळूहळू का होईना पुन्हा सुरळीत होऊ लागले आहे.'' 

तर रांका जेल्वर्सचे शैलेश रांका म्हणाले, "लग्नसराई आणि हमखास रिटर्न देणारा पर्याय म्हणून ग्राहकांनी सोन्याला पसंती देण्यास सुरवात केली आहे. सोने खरेदीला मागणी वाढू लागली आहे. दरवाढ झाल्यामुळे सोने विक्री करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल, असे वाटले होते. परंतु त्याचे प्रमाण फारसे नाही. या उलट भविष्यात आणखी भाव वाढीची शक्‍यता असल्याने गुंतवणूक म्हणून खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढती आहे.'' 

कोरोनामुळे देशासह जागतिक स्तरावर निर्माण झालेली परिस्थिती आणि भारत-चीन वाद यामुळे पडलेले शेअर्स मार्केट, बॅंकांचे घटलेले व्याजदर यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठीचा उत्तम पर्याय आणि अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडणारे म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. गेल्या काही महिन्यात सोन्याचे वाढलेले दर पाहिले, सर्वाधिक रिटर्न सोन्याने दिला आहे. आज सोन्याचा तोळ्याचा दर पन्नास हजारांवर गेला आहे. सप्टेंबरपर्यंत आणखी दर वाढण्याची शक्‍यता असून येत्या वर्षभरात तो सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत जाईल, असे अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि या वर्षभरात लग्न असणाऱ्यांनी आताच सोने खरेदीला प्राधान्य दिल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढू लागली आहे, असे रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तुपाल रांका यांनी सांगितले. 

तर चंदूकाका सराफ ऍण्ड सन्स प्राव्हेट लिमिटेडचे संचालक सिद्धार्थ शहा म्हणाले,"" कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नाचा खर्च कमी करून त्या मोबदल्यात सोने खरेदी करण्याकडे नागरीकांचा कल वाढत आहे. सध्या सर्वाधिक फायदा देऊ शकणारे एकमेव पर्याय म्हणजे सोने आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील तरूण पिढी सोन्याकडे पाहत आहे. त्यामुळे लग्नसराई आणि गुंतवणुक अशा दोन्ही गोष्टींमुळे सध्या सोन्याला मागणी वाढते आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold market is booming again and customers prefer gold for weddings and investments