esakal | उद्योगांना येणार सहा महिन्यांत ‘अच्छे दिन’
sakal

बोलून बातमी शोधा

Industry

उद्योगांना येणार सहा महिन्यांत ‘अच्छे दिन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा उद्योगांवर परिणाम झाल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षणातून आढळले आहे. मार्चच्या तुलनेत उत्पादन क्षमता ८३ टक्क्यांवरून ६९ टक्क्यांवर पोचली असून कामावरील उपस्थितीचे प्रमाणही ८६ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. तसेच उद्योग सुस्थितीत येण्यासाठी अजून ३ ते ६ महिने लागतील, असे ३५ टक्के उद्योग प्रतिनिधींना वाटत आहे.

लॉकडाउन आणि संबंधित घडामोडींमुळे उद्योगांवर कसा परिणाम होत आहे, याचा आढावा घेण्यासाठी ‘एमसीसीसआयए’तर्फे गेल्या वर्षापासून दरमहा उद्योगांचे सर्वेक्षण होत आहे. त्यात शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील सुमारे १५० उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यंदा १४ एप्रिलपासून लॉकडाउन लागू झाला असून, तो १५ मे पर्यंत असेल. यात अत्यावश्यक सेवेशी संबंधित आणि आयात-निर्यात करणारे उद्योग ५० टक्के मनुष्यबळ क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्वेक्षणात उद्योगांची उत्पादन क्षमता गेल्यावर्षी ऑक्टोबर ते यंदाच्या फेब्रुवारीत वाढती असल्याचे दिसून आले. मात्र, मार्च, एप्रिलपासून ती घसरण्यास सुरुवात झाली. तर, मनुष्यबळ उपस्थितीचे प्रमाणही वाढते होते अन् एप्रिलमध्ये ते तब्बल १६ टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.

हेही वाचा: कधी थांबणार हे! सख्या भावांनी पाठोपाठ गमावला जीव

उद्योगांच्या पुरवठा साखळीवर पुन्हा एकदा परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु उद्योग आणि कंत्राटी सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. आगामी आर्थिक वर्षात सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लघु उद्योजकांना मदत करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधाही सक्षम करण्याची गरज आहे.

- सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए

निर्बंधांमुळे उत्पादन क्षमतेत घट होईल, असे अपेक्षित होतेच. मात्र, गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत यंदाचा फटका सौम्य आहे. मात्र, सूक्ष्म आणि लघु उद्योग क्षेत्रात तळात काम करणाऱ्या घटकांवर निर्बंधांचा जास्त परिणाम झाला आहे. त्यांना मदत करणे गरजेचे आहे. कारण अर्थव्यवस्थेत त्यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.

- प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए

loading image