अठराशे बस; दोन लाख प्रवासी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न प्रवाशांपर्यंत पोचविण्यासाठी पीएमपीने आयोजित केलेल्या ‘बस डे’ला सोमवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

पुणे - सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न प्रवाशांपर्यंत पोचविण्यासाठी पीएमपीने आयोजित केलेल्या ‘बस डे’ला सोमवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. नेहमीपेक्षा सुमारे दोन लाख जास्त प्रवाशांनी बसचा वापर केल्यामुळे दोन कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात पीएमपीला यश आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन्ही शहरांत बसची संख्या वाढली, तर प्रवासी संख्याही वाढते हे ‘सकाळ’ने १ नोव्हेंबर २०१२ रोजी पुणेकरांच्या सहभागातून राबविलेल्या ‘बस डे’मधून सिद्ध झाले आहे. त्यापासून प्रेरणा घेत पीएमपीने सोमवारी ‘बस डे’ आयोजित केला होता. सुमारे १ हजार ८०७ बस मार्गांवर धावल्या, तर नेहमीपेक्षा जास्त ३०० चालक ड्यूटीवर आले होते. भोसरी, पिंपरी, कात्रज, स्वारगेट, पुलगेट, हडपसर, कोथरूड, बावधन, निगडी, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आदी स्थानकांवरून प्रवाशांनी अलोट प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनीही बसमधून प्रवास करून प्रवाशांना प्रोत्साहन दिले. अनेक आगारांत सोमवारी तेथील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

दृष्टिहीनांसाठी ‘डोळस’ प्रयोग

सोमवारी पहाटे सहा ते दुपारी दोन दरम्यानच्या टप्प्यात सुमारे साडेसात लाख जणांनी प्रवास केला अन्‌ एक कोटी २६ हजार रुपये पीएमपीच्या तिजोरीत जमा झाले. दुपारी दोन ते रात्री अकराच्या दरम्यानही हाच ‘ट्रेंड’ कायम राहिला. दर सोमवारी प्रवाशांची गर्दी वाढते, ही बाब लक्षात घेऊन पीएमपीने ‘बस डे’चे आयोजन केले होते. पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्यासह मार्गदर्शनाखाली ‘बस डे’ चे आयोजन केले होते. 

पितृछत्र हरपले; आईची मृत्यूशी झुंज

पीएमपीमध्ये काही दिवसांपूर्वी नियुक्त झालेले ३०० चालकांचेही प्रशिक्षण आटोपल्यावर त्यांनी ‘बस डे’मध्ये नियुक्ती दिली होती. मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून पीएमपीने सर्व वाहक, चालकांच्या रजा, साप्ताहिक सुट्या रद्द केल्या होत्या. 

‘बस डे’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढला आहे. पीएमपीने दोन कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठून सुमारे १४ लाख प्रवाशांची वाहतूक करू शकते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुढील काळात अधिक जोमाने प्रयत्न करून अशी कामगिरी कायम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. दरमहा ‘बस डे’ साजरा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल पीएमपीकडून मी आभार मानतो. 
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good response from citizens and Pimpri Chinchwad Pune for bus day