इंदापुरात जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद!

डॉ. संदेश शहा
Sunday, 22 March 2020

कोरोना व्हायरसचे दुसऱ्या टप्प्यातील संक्रमण रोखण्यासाठी आयोजित जनता कर्फ्युला इंदापुरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

इंदापूर : कोरोना व्हायरसचे दुसऱ्या टप्प्यातील संक्रमण रोखण्यासाठी आयोजित जनता कर्फ्युला इंदापुरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य पडल्याने सर्वत्र अघोषित संचारबंदी दिसून आली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. मात्र, शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. 

जनता कर्फ्यू म्हणजे केअर फॉर यु...नक्‍की सहभागी व्हा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास संपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तमाम इंदापूरकरांना तर सर्व व्यापारी बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभागी झाल्याने संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी यानिमित्त सर्वाना धन्यवाद दिले. 

जनता कर्फ्युस सकाळी सात वाजता सुरुवात झाली. मात्र शहराच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण शहर बंद राहिले. पुणे सोलापूर महामार्गावर मध्यवर्ती तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर बस स्थानकात फक्त स्थानकप्रमुख उपस्थित होते. बस स्थानकात आज एकही प्रवासी अथवा एसटी बस नव्हती. नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेल्या मुख्य बाजारपेठ, पंचायत समिती, नगरपरिषद रस्त्यावर साधे चिटपाखरू देखील उपस्थित नव्हते. इंदापूर पोलीस ठाणे तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी फिरत्या पथकाने शहरावर संपूर्ण देखरेख ठेवली. 

यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, आज घडीस इंदापूर शहरात एकही रुग्ण नाही मात्र कोरोना च्या तिसऱ्या टप्प्यात या आजाराचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे 164 बेडचे मुलामुलींचे तसेच शहरातील इतर वसतिगृह अधिग्रहित करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good Response to Janata Curfew in Indapur