पुण्यात गुगल साकारणार 200 वाय-फाय स्पॉट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - शहरातील 200 सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय स्पॉट निर्माण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगविख्यात गुगल कंपनी पुणे महापालिकेला मदत करणार आहे. जुलैपूर्वी शहरातील वाय-फाय स्पॉट कार्यान्वित होणार आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत हा प्रकल्प साकारणार आहे. गुगलच्या थेट मदतीने शहरात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी वाय-फाय स्पॉट उभारणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका आहे. 

नागरिकांना दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील, अशा प्रकल्पांची अंमलबजावणी स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वाय-फाय प्रकल्प होणार आहे. सुमारे 150 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यातून लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) कंपनी, गुगल, रेलटेल, आयबीएम या कंपन्यांची निवड झाली असून, प्रकल्पाची उभारणी संयुक्तपणे होणार आहे. गुगल स्टेशनच्या माध्यमातून शहरात 200 सार्वजनिक ठिकाणांना वाय-फाय स्पॉटच्या माध्यमातून एकत्र आणण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या देखभालीच्या खर्चाचाही त्यात समावेश आहे. तसेच, आपत्कालीन संपर्क यंत्रणा आणि मध्यवर्ती केंद्रातून एकाच वेळी नागरिकांशी जाहीररीत्या संपर्क साधण्यासाठीची यंत्रणाही उभारण्यात येत आहे. वाय-फायसाठी फायबर नेटवर्क रेलटेल कंपनी उभारणार आहे. तसेच, आयबीएम कंपनीकडून स्मार्ट सिटीतील अन्य प्रकल्पांसाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. नागरिकांना एकदा त्याची माहिती देऊन नोंदणी केल्यावर वाय-फाय सुविधेचा वापर करता येईल, असे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनबरोबर याबाबतचा करार 6 जानेवारी रोजी झाला आहे. आता प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे काम सुरू होणार आहे. ही सुविधा नागरिकांना मोफत द्यायची, का त्यासाठी माफक शुल्क आकारायचे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Google approached to play 200 Wi-Fi spot in Pune