esakal | गोपिचंद पडळकर म्हणतात, ‘बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार’
sakal

बोलून बातमी शोधा

gopichand padalkar

पराभवाने खचून न जाता बारामती, इंदापूर दौंडमध्ये नियमित संपर्क ठेवणार आहे. 2024 च्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपिचंद पडळकर म्हणतात, ‘बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होऊ शकते, मला यश मिळाले नसले तरी आगामी काळात या मतदारसंघात काम करून निश्चित बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होईल, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. आज बारामतीत पत्रकारांशी ते बोलत होते. 

पडळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी संधी दिली, माझा पराभव झाला, डिपॉझिटही जप्त झाले, मी या बाबत पक्षाकडे दिलगीरीही व्यक्त केली आहे. मात्र, या पराभवाने खचून न जाता बारामती, इंदापूर दौंडमध्ये नियमित संपर्क ठेवणार आहे. 2024 च्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करणार आहे. बारामतीच्या ज्या विषयांची सभागृहात चर्चा होणार नाही, त्याचा पाठपुरावा आपण करणार आहोत. कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडे 1 लाख कोटी, तर मुंबई महापालिकेजवळ 63 हजार कोटींच्या ठेवी पडुन आहेत. मात्र अनेक घटकांना गरज असूनही शासनाने मदत केली नाही. 

हे वाचा - खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविषयी 'परिवर्तन'नं व्यक्त केली दिलगिरी

नाशिक, कोकणात स्वताः ज्येष्ठ नेते शरद पवार जाऊन आले, मात्र तेथील जनतेलाही सरकारने मदतीचा हात दिलेला नाही. सरकारमध्ये एकमत राहिलेले नसून कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरले आहे. मागच्या सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटींची तरतुद केली होती, त्याकडे महाविकास आघाडीच्या सरकारने दुर्लक्ष केले. धनगर समाजासाठी एक रुपया देखील अर्थसंकल्पात ठेवलेला नाही. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, अभिमन्यू गुळुमकर उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

तर, रस्त्यावर उतरू 
येत्या अधिवेशनात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला. मेंढपाळांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याची गरज असून त्या बाबतही पाठपुरावा करणार असल्याचे पडळकर म्हणाले. या साठी दहा दिवसांच दौरा करणार आहे, मेंढपाळांच्या पालावर मुक्काम करुन त्यांच्या व्यथा जाणून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.