खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविषयी 'परिवर्तन'नं व्यक्त केली दिलगिरी 

टीम ई-सकाळ
Tuesday, 23 June 2020

लोकसभा वेबसाईटवरील माहिती अद्ययावत नव्हती, त्यामुळे ही चूक झाली आहे. श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग यांनी खासदार हे चर्चेत सहभागी झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेतील सहा चर्चांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. लोकसभेच्या वेबसाईटवरील माहिती अद्ययावत नसल्यामुळे चूक झाली असून, त्याबद्दल 'परिवर्तन' या संस्थेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

देशातील खासदारांचे रिपोर्ट कार्ड परिवर्तन संघटनेने सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यात श्रीनिवास पाटील यांनी चर्चांत सहभाग घेतलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर 'परिवर्तन'ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, लोकसभा वेबसाईटवरील माहिती अद्ययावत नव्हती, त्यामुळे ही चूक झाली आहे. श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग यांनी खासदार हे चर्चेत सहभागी झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यावरून ते सहा चर्चांत सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा - स्पर्धा परीक्षेचे वास्तव तुम्हाला माहिती आहे का?

वेबसाइटवर दिसणाऱया कोणत्याही माहितीत आणि प्रत्यक्षातल्या परिस्थितीत तफावत आढळल्यास जरूर आम्हाला संपर्क साधावा. आमच्याकडून तत्काळ दुरुस्ती केली जाईल. या उपक्रमाचा उद्देश हा कोणाचीही बदनामी करण्याचा नसून लोकप्रतिनिधींच्या कामाची जास्तीत जास्त माहिती सामान्य नागरिकांपर्यंत सहजपणे पोचावी, हा आहे. अशा प्रकारची गफलत सामान्य नागरिक, स्वयंसेवी संघटना यांच्याकडून होऊ नये म्हणून सर्वच राजकीय पक्ष सर्व खासदारांबद्दलची माहिती लोकसभेच्या वेबसाईटवर नेहमीच अद्ययावत असावी, यासाठी प्रयत्नशील राहतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे संघटनेतर्फे अध्यक्ष अंकिता अभ्यंकर, समन्वयक सायली दोडके आणि तन्मय कानिटकर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा - शेतकऱ्याच्या पोराची कमाल, झेडपीच्या शाळेत शिकून एमपीएससीत फडकवला झेंडा

काय आहे प्रकरण?
माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. त्यानंतर लोकसभेत खासदार पाटील यांची 80 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थित होती. मात्र, परिवर्तन संस्थेने सादर केलेल्या अहवालात त्याचा उल्लेख नाही. तसेच खासदार पाटील यांनी विविध विषयांवरील चर्चेतही सहभाग घेतलेला आहे. त्याची अधिकृत नोंदही उपलब्ध आहे. याबाबत खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातर्फे मंगळवारी खुलासा करण्यात आला. त्यानंतर काही मिनिटातंच परिवर्तन संस्थेनेही चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parivartan sanstha mp shriniwas patil report card clarification