गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षितच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 जानेवारी 2019

हा त्रास होऊ शकतो
  लस दिलेल्या जागी दुखणे
  लालसरपणा येणे
  खाज येणे
  रॅश येणे
  ताप, उलट्या, मळमळ

पुणे - पुण्यातील गोवर-रुबेलाचे लसीकरण सुरक्षित झाले असून, काही मुले घाबरल्याने त्यांना ‘रिॲक्‍शन’ आली असेल, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी बैठकीत व्यक्त केली. या रिॲक्‍शनमध्ये गंभीर असे काही नव्हते, यावरही त्यांनी शिक्कामोर्बत केले. 

पुण्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रुबेला या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेत काही मुलांना लसीकरणानंतर त्रास झाला होता. लसीकरणामुळे ‘रिॲक्‍शन’ आल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर मुलांना त्रास का झाला, याचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यात तज्ज्ञ डॉक्‍टर, महापालिकेचे आणि राज्य सरकारचे अधिकारी आणि मानव वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले. 

याबाबत माहिती देताना भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ‘‘लसीकरण मोहिमेत लस घेतल्यानंतर २७ मुलांना त्रास झाल्याचे लक्षात आले. चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना त्रास झाला होता. लस घेताना काही मुले घाबरल्याने त्रास झाला असण्याची शक्‍यता असते. लस घेतलेल्यांपैकी फक्त चार मुलांना अंगावर पुरळ व खाज अशी लक्षणे दिसली.’’

‘‘लसीकरणानंतर येणारी खाज किंवा पुरळे ही ‘ॲलर्जिक रिॲक्‍शन’ असू शकते. अशी ‘रिॲक्‍शन’ कोणत्याही लसीकरणानंतर होण्याची शक्‍यता असते,’’ असे त्यांनी सांगितले. 

 

गोवर आणि रुबेलाची लस दिलेल्या मुलांना झालेल्या त्रासाचा अभ्यास केल्यावर असा निष्कर्ष काढण्यात आला की, या सगळ्या घटना योगायोगाने घडल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने लसीकरणानंतरच्या येणाऱ्या ‘रिॲक्‍शन’ची वर्गवारी केली आहे. त्यानुसार पुण्यातील काही मुलांना झालेला त्रास हा ‘सी’ वर्गातील आहे. 
- डॉ. संजय ललवानी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल

Web Title: Gover Rubella Vaccination Safe