राज्यातील शेतीपंप सौर उर्जेवर आणणार : बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

यावर्षी एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची सरकारची योजना असून पुढील पाच वर्षांत राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर ऊर्जेवर आणण्याचे सरकारचे धोरण असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

पुणे : यावर्षी एक लाख शेतकऱ्यांना सौर पंप देण्याची सरकारची योजना असून पुढील पाच वर्षांत राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांचे शेती पंप सौर ऊर्जेवर आणण्याचे सरकारचे धोरण असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

येथील अल्पबचत भवनच्या सभागृहात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)चा 35 वा वर्धापनदिन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाजनकोचे (माईंनिग) सल्लागार व संचालक पुरुषोत्तम जाधव, महाऊर्जाचे महासंचालक कांतीलाल उमाप उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, देशातील सर्वांत जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्मिती महाराष्ट्र करतो. 2024 पर्यंत एकशे पंच्याहत्तर  गिगा वॉट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी देशासमोर ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील. गेल्या पाच वर्षांत सरकारने राज्यातील वीज नसलेल्या  एकोणीस लाख कुटुंबीयांना वीज उपलब्ध करून दिली आहे. राज्यासह देशाची प्रगती ही ऊर्जा निर्मितीवर अवलंबून असते.

जे राज्य प्रतिमाणसी अधिक उर्जेचा वापर करते, ते राज्य प्रगत म्हणून ओळखले जाते. आपल्याला महाराष्ट्राला सर्वात अग्रेसर ठेवायचे आहे. त्यासाठी राज्याला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील असून त्या दृष्टीने सरकारने धोरण तयार केले आहे. त्याच बरोबर स्वस्त वीज निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे.

"आपण 61 टक्के वीज औष्णिक उर्जा केंद्रातून निर्माण करतो. त्यामुळे मोठे प्रदूषण होते, त्यावर मात करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करण्यावर भर देणे आवश्यक आहे." 

- राज्यमंत्री शिवतारे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government introduces policy to bring agricultural pumps to solar power says Minister of energy