बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्रारंभ

मिलिंद संगई
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

बहुप्रतिक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजास आजपासून अधिकृतरित्या प्रारंभ झाला. बारामतीच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण असून या मुळे एज्युकेशनल हब असलेल्या बारामतीच्या विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे.

बारामती शहर - बहुप्रतिक्षित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामकाजास आजपासून अधिकृतरित्या प्रारंभ झाला. बारामतीच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण असून या मुळे एज्युकेशनल हब असलेल्या बारामतीच्या विकासाला अधिक गती प्राप्त होणार आहे. 

या महाविद्यालयामध्ये दरवर्षी शंभर अशा क्षमतेने पाच वर्षात पाचशे विद्यार्थी क्षमता होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी दिली. काल विद्यार्थी, पालक व शिक्षकांची अनौपचारिक बैठक झाली. यामध्ये सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. डॉ. तांबे, डॉ. सदानंद काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते. 

नीट परिक्षेच्या माध्यमातून देशभरातील उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी बारामतीच्या महाविद्यालयात पुढील पाच वर्षे शिक्षण घेणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहासह सर्व सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. 
पहिल्या वर्षी अँटॉनॉमी, फिजिओलॉजी व बायोकेमिस्ट्री या तीन विषयांचे शिक्षण या शंभर विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. 

राज्य शासनाने महिला ग्रामीण रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयास तीन वर्षांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न केलेले आहे. या महाविद्यालयाशेजारी नवीन अत्याधुनिक शासकीय रुग्णालयाचे काम युध्दस्तरावर सुरु असून लवकरच हे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 

दरम्यान या महाविद्यालयाचे विद्यार्थी बनण्याचा मान मिळत असल्याचा आनंद येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. 

बारामतीकरांच्या पाठिंब्यामुळेच प्रकल्पपूर्तता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे याचा आनंद आहे. बारामतीकरांचा पाठिंबा तसेच मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, अर्थमंत्री, विविध विभागांचे सचिव व अधिका-यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होत आहे. बारामतीच्या सर्वांगिण विकासाला या मुळे नक्की चालना मिळेल- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री. 

महाविद्यालयाचे कामकाज नियमित होईल
आजपासून या महाविद्यालयाचे कामकाज नियमित सुरु होणार आहे. देशाच्या विविध भागातून विद्यार्थी आलेले असून त्यांना सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. जी कामे मार्गी लावायची आहे ती वेगाने सुरु असून काही दिवसात सर्व कामे पूर्ण होतील- डॉ.संजयकुमार तांबे, वैद्यकीय अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Medical College Start in Baramati