सेवानिवृत्त अद्याप पेन्शनच्या प्रतीक्षेत

Retired-People
Retired-People

बावधन - मार्च महिन्याचे एकवीस दिवस उलटले तरी मुळशी तालुक्‍यातील सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. इतर तालुक्‍यांत सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्तांच्या खात्यात पेन्शनही जमा झाली. मात्र, मुळशी तालुक्‍यातील ज्येष्ठांना पेन्शनअभावी विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे.

तालुक्‍यात तीनशे प्राथमिक शिक्षकांसह विविध खात्यातील सुमारे साडेचारशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पेन्शन मिळत होती. वृद्धापकाळात सुखाच्या संसारासाठी अनेक ज्येष्ठांना पेन्शनवरच अवलंबून राहावे लागते. पेन्शनवरच अनेक ज्येष्ठांच्या चुली पेटतात. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी लागणाऱ्या विविध औषधोपचारांसाठीही त्याचा उपयोग होतो. 

महाराष्ट्र सरकारने सर्वांना सातवा वेतन आयोग लागू केला. त्यानुसार सर्वत्र सध्या नोकरीत असलेल्या व निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची निश्‍चिती करण्यात आली. मात्र, मुळशी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सेवानिवृत्तांच्या पेन्शनची निश्‍चिती करण्यास विलंब लागला. त्यामुळे वीस दिवस उलटूनही साडेचारशे ज्येष्ठांना पेन्शनपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

पेन्शनअभावी ज्येष्ठ दांपत्यांना त्यांच्या आरोग्यासाठी लागणारा औषधोपचार, घराचा कर, किराणा माल त्याचप्रमाणे इतर प्रापंचिक सोयी-सुविधांबाबत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ज्येष्ठांचा प्रपंच केवळ दर महिन्याला मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून असतो; परंतु मार्च महिन्यात मात्र त्यांना समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे.

तालुक्‍यातील सेवानिवृत्तांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळावी. त्यांच्या फरकाची रक्कम निश्‍चित व्हावी असा संघटनेचा आग्रह होता, यापुढे दर महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या आत सेवानिवृत्तांच्या खात्यात पेन्शन जमा व्हावी, अशी संघटनेची मागणी आहे.
- एन. डी. मारणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशन

पंचायत समितीमधील शिक्षण विभागात अपुरे कर्मचारी बळ असल्याने कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्‍चिती करण्यास वेळ लागला. आता ही निश्‍चिती झाली असून सेवानिवृत्तांच्या खात्यात पेन्शनची रक्कम वर्ग केली आहे.’’ 
- स्मिता पाटील, गटविकास अधिकारी, मुळशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com