esakal | शासनाने कोविड सेंटर बंद करू नयेत- हर्षवर्धन पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

harshwardhan patil

शासनाने कोविड सेंटर बंद करू नयेत- हर्षवर्धन पाटील

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : एकीकडे राज्यशासन कोविडची तिसरी लाट येणार असून, त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देत आहे. तर दुसरीकडे कोविड रुग्ण कमी झाल्याचे कारण पुढे करत, पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर दि.१ सप्टेंबरपासून बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

या निर्णयामुळे इंदापुरचे कोरोना रुग्ण बारामतीस पाठविण्याचा निर्णय गैरसोय करणारा ठरणार असून, शासनाने कोविड रुग्णांचा जीव वाचण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर बंद करू नयेत, अशी मागणी माजी सहकार मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली.

पाटील पुढे म्हणाले, इंदापूर येथील कोविड सेंटर बंद करणे ही शासनाने तालुक्यातील जनतेची चालवलेली चेष्टा आहे. इंदापूर तालुक्यात सध्या रोज ४० ते५० कोरोनारुग्ण सापडत आहेत, तर काहींना दुर्दैवाने जीवही गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये इंदापूरचे कोविड केअर सेंटर चालू राहणे गरजेचे आहे. या केंद्रातील कंत्राटी तत्त्वावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या शासनाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: अतिक्रमणावर कारवाईसाठी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला

सध्या आरोग्य व्यवस्था मजबूत करणे महत्त्वाचे असताना शासनच आहे. ती पदे रद्द करून जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. शासनाने केंद्र सरकारला जबाबदार न धरता हा पोरखेळ थांबविणे गरजेचे आहे. कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करण्याचा इशारा मुख्यमंत्री देत असून, ते कोरोनासंदर्भात गंभीर दिसत आहेत.

मात्र कोरोना रुग्णांना तालुक्यात तात्काळ चांगले उपचार मिळणे हा नागरिकांचा हक्क असताना, जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची कोविड केअर सेंटर बंद करण्याच्या द्रविडी प्राणायाम शासन का करत आहे हे समजत नाही. त्यामुळे आम्ही शासनस्तरावर वरिष्ठांची भेट घेऊन तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना केअर सेंटर बंद करू देणार नाही, असा इशारा शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

loading image
go to top