अर्थसंकल्पातून सत्ताधाऱ्यांचे "सोशल इंजिनिअरिंग' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नागपूर - स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी सर्व समाजाला दिलासा देत उत्पन्नवाढीवर भर देणारा 2,946 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. विरोधी पक्षाने अर्थसंकल्पाच्या अभ्यासासाठी तीन दिवसांचा वेळ मागितला असून, यावर 14 जून रोजी चर्चा होणार आहे. कुकरेजा यांनी कुठलाही कर न वाढविता नव्या योजनांच्या मागे न धावता राज्य शासनाच्या अनुदानावरच अर्थसंकल्पाचा पाया रचला. 

महापालिकेच्या महाल येथील नगरभवनात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत स्थायी समिती अध्यक्ष कुकरेजा यांनी 2018-19 या वर्षात 2,801 कोटींच्या उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त करीत मागील शिल्लक 144.99 कोटींसह 2,946 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. दुग्ध व्यावसायिकांसाठी नंदग्राम पशुनिवारा, गठई कामगारांसाठी संत रविदास आश्रय योजना, मातंग समाजाचे प्रेरणास्थान अण्णाभाऊ साठे स्मारकाचे सौंदर्यीकरण, आदिवासींचे दैवत शहीद बिरसा मुंडा स्मारक, वाल्मीकी धाम, सुदर्शन धामची निर्मिती, खाटीक बंधूंसाठी मच्छीसाथ येथे मटण मार्केट, भोई समाजासाठी वातानुकूलित मासोळी बाजार यासह बाळासाहेब देवरस पथ त्रिवेणी स्मारक, डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकासाठी निधीची तरतूद करीत वीरेंद्र कुकरेजा यांनी "सोशल इंजिनिअरिंग'वर भर दिल्याचे दिसून येत आहे. उत्पन्नासाठी त्यांनीही शासनाच्या अनुदानाचा तसेच कर्जाचा उल्लेख केलाच, शिवाय मालमत्ता करातूनही मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली. 

जुन्याच चांगल्या योजना पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत नसले तरी परंपरागत स्त्रोतातून उत्पन्न वाढविण्यावर गांभीर्याने भर देण्यात येईल. याशिवाय अनधिकृत बांधकाम नियमितीकरण तसेच टीओडीद्वारे मेट्रो रेल्वेच्या दोन्ही बाजूने 500 मीटर क्षेत्रातूनही उत्पन्न मिळेल. 
- वीरेंद्र कुकरेजा,  अध्यक्ष स्थायी समिती. 

अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा आहे. अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक योजना असून, नगरसेविकांनाही दिलासा देणारा आहे. जिजाऊ स्मृती संशोधन केंद्र महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यातून महिलांमध्ये नेतृत्व विकास, स्वसंरक्षणाचे धडे, औद्योगिक प्रशिक्षक दिले जाईल. 
- नंदा जिचकार,  महापौर

Web Title: Governments of Social Engineering from Budget