राज्यपाल झाले छत्रपती शिवराय चरणी नतमस्तक; शिवनेरीला भेट

ch.jpg
ch.jpg

आपटाळे : छत्रपती शिवराय हे अवतारी पुरुष होते. शिवजन्मभूमी ही पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवरायांचे दर्शन घेणे हे पुण्य आहे. देशात पुन्हा एकदा श्रीराम, श्रीकृष्ण, गुरूगोविंद सिंग, छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत कारण आपल्या देशाकडे जग वाकड्या नजरेने पाहणार नाही.  या आशेने शिवजन्मभूमीत आलो आहे.

सर्वांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा अशी भावना व्यक्त करत  महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे  छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले. कोश्यारी यांनी रविवार ता 16 रोजी किल्ले शिवनेरीस भेट दिली. यावेळी कोश्यारी यांनी ही भावना व्यक्त केली.

सकाळी सव्वादहा वाजता कोश्यारी यांचे जुन्नर येथे आगमन झाले. जुन्नर येथील शासकीय विश्रामगृहात तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कोश्यारी हे किल्ले शिवनेरीकडे रवाना झाले. विश्रामगृह ते किल्ले शिवनेरी पायथा तसेच किल्ले परिसर या मार्गावर पोलिस दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी कोश्यारी यांच्या हस्ते शिवाई देवी मंदिरात शिवाई देवीची आरती करण्यात आली. शिवकुंज येथे राजमाता जिजाऊ व  बालशिवबा यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवजन्मस्थळ येथे पाळणा हलवून पूजन करण्यात आले. या भेटीत कोश्यारी यांनी गडावरील  महा दरवाजा, गणेश दरवाजा, पिराचा दरवाजा, हत्ती दरवाजा या दरवाज्यांची सविस्तर माहिती घेतली. साखळदंड, शिवकुंज, जन्मस्थळ आदी भागांची पाहणी केली. किल्ल्यावरील विविध वन झाडांची पाहणी करत सविस्तर माहिती घेतली. जवळपास दोन अडीच तास कोश्यारी यांनी गडाची पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, तहसीलदार हनुमंत कोळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता बाप्पा बहिर, उपवनसंरक्षक जयरामे गौडा, पोलिस उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, नायब तहसीलदार सचिन मुंढे, मंडलाधिकारी शोभा भालेकर, राजेंद्र पोटकुले, दत्तात्रेय लवांडे, तलाठी शरद दोरग, मलप्पा ढोणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिवाजी ट्रेलचे प्रा. विनायक खोत यांनी किल्ले शिवनेरीची माहिती यावेळी कोश्यारी यांना दिली. यावेळी कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी विकासाबाबत आमदार अतुल बेनके व प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत शिवकुंज येथे बैठक घेत चर्चा केली. 

कोश्यारी यांनी गडाच्या पायथ्यापासून ते शिवजन्मस्थळ पर्यंतचा संपूर्ण प्रवास पायी पूर्ण केला. याबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी छत्रपती शिवरायांची प्रेरणा यामागे असल्याचे सांगितले. तर तत्कालीन काळात छत्रपती शिवराय हे कशाप्रकारे गडमोहिमा पार पाडत असतील असे सांगत छत्रपती शिवराय हे अवतारी पुरुषच असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com