नोटांसाठी जीपीओ, सिटी पोस्टात झुंबड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पुणे - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी टपाल विभागाने जीपीओ, सिटी पोस्ट येथे व्यवस्था केली होती. त्यामुळे नोटा बदलून घेण्याकरिता दिवसभर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु, शहर व उपनगरांतील कार्यालयांमध्ये गुरुवारी व्यवस्थाच होऊ न शकल्याने, अनेक नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. दुपारी दीड नंतर रक्कम उपलब्ध झाली. त्यानंतर सर्व कार्यालयांना वितरित केल्याचे विभागाने म्हटले असले, तरीही अनेक नागरिकांना नोटा बदलून घेण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे सर्वच कार्यालयांत सेवासुविधा पुरविल्याचा विभागाचा दावा फोल ठरला. 

टपाल विभागातर्फे दररोजच्या आर्थिक व्यवहारांकरिता बॅंकेकडून आवश्‍यक तेवढी रक्कम मागविण्यात येते. नागरिकांना पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. मात्र जीपीओ, सिटी पोस्ट या ठिकाणी ही सुविधा होती. त्या तुलनेत स. प. महाविद्यालय, लोकमान्यनगर, सदाशिव पेठ, नारायण पेठ येथील तसेच शहर व उपनगरांतील अन्य कार्यालयांकडे वेळेत व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे तेथे शुकशुकाटच होता. जीपीओ, सिटी पोस्ट येथे सकाळी दहा वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी केली होती. नोटा बदलून घेण्याकरिता नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. 

आधार कार्ड, वाहन परवाना, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, नरेगा कार्ड, पॅन कार्ड यांपैकी कोणतीही एक ओळख दाखवून नोटा बदलून देण्यासाठी अर्ज भरून घेण्यात येत होता. त्यानुसार चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून देण्यात येत होत्या. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टपाल कार्यालयांत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

जीपीओचे पोस्ट मास्तर आर. एस. गायकवाड म्हणाले,""नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयाने गंगाजळीची व्यवस्था केली होती. अधिक नागरिकांना या सेवेचा लाभ मिळावा यासाठी स्टेट बॅंकेकडे गंगाजळीची मागणी केली आहे.'' 

दरम्यान, रक्कम संपल्याने सीटी पोस्ट येथे आलेल्या अनेक नागरिकांना पुष्कळ वेळ उभे राहावे लागले. याबाबत पोस्ट मास्तर के. आर. कोरडे म्हणाले,""बॅंकेकडून जशी रक्कम उपलब्ध होईल, त्याप्रमाणे नागरिकांना नोटा बदलून देण्यात येतील. मात्र दुपारी दीड वाजेपर्यंत पाचशे, हजार रुपयांच्या बदल्यात सुमारे पंधरा लाख रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात आली. रक्कम उपलब्ध होताच शनिवारी (ता. 11) पासून अन्य कार्यालयांकडेही वितरित करण्यात येईल. मात्र नवीन खाती उघडून त्यामध्ये पैसे भरावेत, असे खात्यातर्फे ग्राहकांना आवाहन केले आहे. '' 

""नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर येथील कार्यालयांतही आर्थिक व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवून ग्राहकांना चांगली सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. मोबाईल टीमही शहरातील कार्यालयांना भेट देत आहे. पंढरपूर येथे कार्तिकी वारीकरिता जमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. 
- गणेश सावळेश्‍वरकर, पोस्ट मास्तर जनरल 

Web Title: GPO,City Post crowed for notes