...तर बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याशेजारी करणार आंदोलन; ग्राहक पंचायतीचा निर्वाणीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

राज्य सरकार सतत बघ्याची भूमिका घेत आहे. या आंदोलनाकडे लक्ष न दिल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयासमोर शांतता मार्गाने महिला आंदोलन करणार आहेत.

मंचर (पुणे) : आंबेगाव-जुन्नर तालुक्यात बिबट्या प्रवण क्षेत्र जवळपास सर्वच गावांमध्ये आहे. आतापर्यंत ३३ व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात घरांसाठी आणि कृषी पंपासाठी महावितरण (Mahavitaran) कंपनीने वीजजोड प्राधान्याने द्यावा. कृषी पंपाना बारा तास वीज पुरवठा करावा आदी प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (ता.१७)पासून बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्या शेजारीच रात्रंदिवस आंदोलन करण्याचा इशारा ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब सीताराम औटी यांनी दिला आहे.

एकलहरे (ता.आंबेगाव) येथे रविकिरण हॉटेलच्या सभागृहात रविवारी (ता.९) झालेल्या पत्रकार परिषदेत औटी बोलत होते. यावेळी जिल्हा ऊर्जा समितीचे प्रमुख नितीन मिंडे, डॉ. बाळकृष्ण घंगाळे, जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, सुभाष मावकर, वैशाली अडसरे उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांसाठी कोरोना विमा संरक्षण; शिरुर बाजार समिती ठरली राज्यात पहिली!​

औटी म्हणाले, ''या भागातील अनेक क्षेत्र अजूनही अंधारात आहेत. आणि बिबट्याचा उपद्रव आणि दहशत वाढतच चालली आहे. १०० हून अधिक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. आठ हजार ७२८ पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काहीजणांची नुकसान भरपाईची रक्कम प्रलंबित आहे. शेतकरी आणि नागरिकांना जीव मुठीत धरूनच पिकांना पाणी द्यावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठी स्ट्रीट लाईट कामे सुरू करावी. ग्रामपंचायतीने स्ट्रीट लाईट थकबाकी भरल्याशिवाय नवीन वाढीव वीज जोडणी देण्यात येऊ नये. असे परिपत्रक १४ मे २०१८ रोजी महावितरणने काढले आहे.

सदर परिपत्रक तात्काळ रद्द करावे. जुन्नर तालुक्यात पथदिव्यांचा सहा हजार ६८० तर आंबेगाव तालुक्यात दोन हजार ७५७ विजेचे खांब मंजूर झालेले आहेत, पण सदर परिपत्रकामुळे अनेक ग्रामपंचायती स्ट्रीट लाईटची कामे थांबली आहेत. कृषी पंप आणि घरगुती वीज ग्राहकांची वीज बिले दुरुस्त केल्यानंतर अचूक वीज बिलाचे आधारित दंड, व्याज, माफ आणि मुद्दल बिलाच्या ५० टक्के सवलत देणारी नवी कृषी संजीवनी योजना राबवावी. राज्याच्या उर्जामंत्र्यांनी जाहीर केलेल्या दरमहा घरगुती वीज ग्राहकांसाठी १०० युनिटच्या आतील ग्राहकांना मोफत वीज या घोषणेची अंमलबजावणी करावी.

ढोबळी मिरचीच्या तीनच तोड्यात शेतकरी दाम्पत्याने कमावले सव्वा लाख​

या मागण्या त्वरित मागण्या मान्य न झाल्यास आंबेगाव जुन्नर तालुक्यातील पंचवीस गावात ज्या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे. तेथे ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते उपोषण करून आंदोलन करणार आहेत. राज्य सरकार सतत बघ्याची भूमिका घेत आहे. या आंदोलनाकडे लक्ष न दिल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयासमोर शांतता मार्गाने महिला आंदोलन करणार आहेत. राजुरी (ता.जुन्नर) येथून आंदोलनाला सुरवात होईल, असे औटी यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grahak Panchayat has warned to agitate to draw the attention of the government to the major demands