वाल्ह्यात हाणामारीमुळे मतदानावेळी तणाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

वाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर); तसेच आडाचीवाडी, वागदरवाडी व सुकलवाडी या चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान रविवारी (ता. २७) शांततेत सुरू झाले. मात्र दुपारी एका कार्यकर्त्याने भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केल्याने काही वेळ वाल्हे मतदान केंद्राजवळ तणाव वाढला होता. या बाचाबाचीचे पर्यवसन किरकोळ दगडफेकीत झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर पिटाळून लावल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली. दरम्यान, आडाचीवाडी येथेही किरकोळ बाचाबाची झाली. 

या वेळी मतदानासाठी आलेल्या महिला मतदार व उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने मोठ्या प्रमाणावर पळापळ झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बंदोबस्तासाठी आलेले सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट; तसेच जेजुरीचे पोलिस उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांनी  मतदान केंद्रामध्ये अतिरिक्त कुमक बोलावून गोंधळ घालणाऱ्या जमावाला मतदान केंद्रापासून पिटाळून लावले.

वाल्हे ग्रामपंचायतीमधून विभक्त झालेल्या व नव्याने ग्रामपंचायत स्थापन झालेल्या आडाचीवाडी या ठिकाणी मतदान केंद्र परिसरामध्ये मतदारांबरोबर कार्यकर्ते सतत येत असल्याने दोन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या. या ठिकाणीसुद्धा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. वागदरवाडी व सुकलवाडी या ठिकाणी मात्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्राबाहेर साहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. हाके तसेच श्रीरंग निगडे, संदीप कारंडे, संदीप पवार, विजय जाधव, गणेश कुतवळ आदी पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते.

Web Title: gram panchayat election