मी लढतोय; तुम्हीपण लढा!

मी लढतोय; तुम्हीपण लढा!

जुन्नरच्या द्राक्षउत्पादकांचा नैसर्गिक संकटाशी लढण्यासाठी एकमेकांना आधार

नारायणगाव (पुणे) : अवकाळी पावसामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे द्राक्ष उत्पादकांची बैठक घेण्यात आली. या वेळी मी लढतोय; तुम्हीपण लढा. एकमेकांना आधार देत सर्वजण मिळून या नैसर्गिक व आर्थिक संकटाचा सामना करू, असा संदेश प्रमुख द्राक्षउत्पादकांनी दिला.


ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील द्राक्ष उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. फवारणीचा खर्च वाढल्याने उत्पादन व खर्च याचा ताळमेळ कसा लागणार, सुमारे 70 टक्के हंगाम वाया जाण्याच्या शक्‍यतेमुळे द्राक्ष पिकासाठी घेतलेले पीककर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत उत्पादक असल्याने द्राक्ष उत्पादक कुटुंबाचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. या परिस्थितीत संभाव्य अनुचित घटना टाळून एकमेकांना आधार देण्यासाठी द्राक्ष तज्ज्ञ मंगेश भास्कर यांच्या उपस्थितीत गुंजाळवाडी येथील शिवछत्रपती सभागृहात द्राक्ष बागायतदारांची बैठक झाली.


या वेळी विकास दरेकर, प्रकाश वाघ, हरिभाऊ वायकर, जयसिंग वायकर, राजू औटी, सुजित पाटे, नितीन भोर, शरद फापळे यांच्यासह सुमारे दोनशे द्राक्षउत्पादक उपस्थित होते. या वेळी द्राक्षतज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी सद्यस्थितीतील द्राक्ष बागेतील अडचणी आणि उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणी व सरकारकडून दिली जाणारी तुटपुंजी मदत, फसवी पीकविमा योजना या बाबत निवेदन तयार करण्यात आले. हे निवेदन सरकारला देऊन याबाबत पाठपुरावा करण्यासाठी समिती नेमण्यात आली.


या वेळी तालुका द्राक्ष उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर, विकास दरेकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा पीकविमा अद्याप मिळाला नाही, या वर्षीच्या फळ पीक विमा योजनेचा लाभ आठ नोव्हेंबरनंतर झालेल्या नुकसानीला मिळणार आहे. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या नुकसानीचे काय, पिकांचे नुकसान झाल्याने पीककर्ज कसे भरणार, सरकारने पीककर्ज माफ करावे, द्राक्ष पिकाला एकरी 7 हजार 200 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते, ही भरपाई म्हणजे दोन फवारणीचा खर्च आहे, सरकार फक्त घोषणा करते, अंमलबजावणीचे काय? आदी प्रश्न उपस्थित केले.

 
"विमा कंपन्यांचे हित थांबवा'
सरकारने विमा कंपन्यांच्या हिताची जपणूक थांबवावी. पीकविमा योजना ही विमा कंपन्यांच्या हिताची असून फसवी आणि चुकीची आहे, ती शेतकरीहित जपणारी तयार करावी, अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com