जुन्नरमधील द्राक्ष बागांना फटका

Draksh
Draksh

नारायणगाव (पुणे) : पाऊस, ढगाळ वातावरण, धुके, सूर्यप्रकाशाचा अभाव, दव या प्रतिकूल हवामानाचा फटका जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष बागांना बसला आहे. बागा वाचविण्याच्या प्रयत्नात केलेल्या बुरशी नाशकांच्या फवारणीसाठी उत्पादकांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

जुन्नर तालुक्‍यात द्राक्ष बागाखाली सुमारे पाच हजार एकर क्षेत्र आहे. तालुक्‍यात मागील एक महिन्यापासून ढगाळ वातावरण असून, मागील तीन दिवसांपासून तालुक्‍यात पाऊस सुरू आहे. द्राक्ष बागांच्या वेलीवर करपा, डावणी या बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. फुलोरा अवस्थेतील घडात पावसाचे पाणी साठून राहत असल्याने फुलगळ वाढून घडकुज झाली आहे. पोंगा अवस्थेतील बागेतील कोवळ्या पानांवर मोठ्या प्रमाणात डावणी, करपा रोगांच्या प्रादुर्भाव झाल्याने कोवळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले आहे. पंधरा दिवसांपासून शेतकरी रोज सकाळ व सायंकाळी बागेवर औषधांची फवारणी करत आहेत. एका फवारणीसाठी एकरी किमान दीड ते दोन हजार रुपयांचा खर्च होत आहे. भर पावसात ट्रॅक्‍टरच्या साह्याने शेतकरी बागेवर फवारणी करत आहे. मात्र पावसामुळे रोग आटोक्‍यात येत नसून फवारणीचा खर्च व मेहनत वाया जात आहे, अशी माहिती तालुका द्राक्ष उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर यांनी दिली.

खर्च व उत्पन्नाचा मेळ बसत नाही
द्राक्ष निर्यातीतून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. द्राक्ष निर्याती बाबतच्या केंद्र सरकारच्या धरसोड धोरणाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. मागील वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. मात्र पीकविमा असूनही अद्याप एक रुपयाची सुद्धा नुकसानभरपाई मिळाली नाही. खर्च व मिळणारे उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याने सात बारा उताऱ्यावर कर्जाचा भार वाढत चालला आहे, असे जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com