जुन्नरमध्ये द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट

Draksh
Draksh

जुन्नर (पुणे) : सततचा पाऊस, धुके व ढगाळ वातावरणामुळे जुन्नर तालुक्‍यात फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना घड आणि फळकुजीमुळे फटका बसला आहे. यात द्राक्ष उत्पादकांचे सुमारे 80 टक्के नुकसान झाल्याची माहिती जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली.

प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षांवर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीच्या खर्चाला सुमार राहिला नाही, तर फवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. घड कुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर 50 टक्के नुकसान तत्काळ स्वरूपात झाले आहे. आठ दिवसांनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान वाढण्याची भीती आहे. सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फुलोरा, फेलफुट, डिपिंग या अवस्थेत आहेत. काही बागांच्या छाटण्या सुरू आहेत. काही बागा पोंगावस्थेत आहेत. काही बागा फेलफुट ते कळीच्या डीप अवस्थेत आहेत. या हवामानामध्ये सगळ्यात जास्त धोका दोडा अवस्थेपासून मणीधारणा अवस्थेपर्यंतच्या बागांना आहे. साधारणतः: 15 ऑक्‍टोबरपासून लागू होणारा हवामान आधारित फळपीक विमा अद्यापही जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. द्राक्ष पिकाच्या झालेल्या व होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल शेतकरी करत असून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

घड जिरण्याची समस्या
सतत पाऊस पडत राहिल्याने ज्या बागा पोंगा अवस्थेत आहेत त्यांच्यातही घड जिरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्याचे प्रमाण अजून वाढू शकते. हे देखील मोठे नुकसान म्हणायला हवे. सध्या रोगांपासून बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा 30 ते 40 टक्के खर्च केवळ बुरशीनाशकांवर होतो आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे नुकसान व वाढलेला भरमसाट खर्च यातून शेतकऱ्यांच्या हाती काय लागणार हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे
ज्या बागांची वेळेवर छाटणी झाली आहे किंवा ज्या बागा पोंगा किंवा फुटण्याच्या अवस्थेत आहेत, त्यांच्यात डाऊनी रोगाचा मोठा धोका तयार झाला आहे. सद्यःस्थितीत या बागा वाचवणे देखील आव्हानाचे होऊन बसले आहे. शरद सीडलेस, जंबो या वाणांना मागील वर्षीच माल कमी होता. याचे कारण म्हणजे एप्रिलमध्ये त्यांना पाण्याचा ताण सहन करावा लागला होता. पाऊस पडून गेल्यानंतरही घडकुजीचे लक्षण दिसण्यास काही अवधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

असे झाले नुकसान

  •  आगाप द्राक्षांचे 30 ते 80 टक्के नुकसान
  •  फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
  •  घडांतील मणी पावसाने फुटले
  •  मणी, घडांवर डाऊनीचा मोठा प्रादुर्भाव
  •  फवारण्या करूनही उपयोग होत नाही

ज्या बागा पाच-सहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या कालावधीत छाटल्या आहेत, त्या फुलोरा अवस्थेत आहेत. त्यांच्यात घडकूज ही समस्या तयार झाली आहे. हे नुकसान सुमारे 20 टक्‍क्‍यांपासून ते 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. पुढेही पाऊस पडला तर नुकसानीची तीव्रता अजून वाढणार आहे. या बागांचा माल जानेवारी ते फेब्रुवारीत सुरू होणार असल्याने त्यांना मोठ्या उत्पादन घटीला सामोरे जावे लागणार आहे.
- जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com