esakal | ‘पीएच.डी.’ झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

‘पीएच.डी.’ झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे - रखडलेली प्राध्यापक भरती (Professor Recruitment) आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांना पीएच.डी. मार्गदर्शक (PhD Guidance) म्हणून घेण्यास प्रतिबंध, यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर पीएच.डी आणि एम.फील मार्गदर्शकांची संख्या कमी झाली होती. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी पीएच.डी. अनिवार्य केल्यामुळे पीएच.डी. करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. आता हा तुटवडा भरून काढण्यासाठी विद्यापीठाने उशिरा का असेना युजीसीची नवीन नियमावली लागू केली आहे. (Great Relief to the Students who have done PhD)

स्वतःची पीएच.डी. आणि दोन शोधनिबंध प्रसिद्ध असणाऱ्या प्राध्यापकांना पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणारे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे गाईडशीप करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या तर वाढेल, त्याबरोबर अनेक विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध होईल.

हेही वाचा: ''स्पर्धा परीक्षेच्याही पुढे जग आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा''

विद्यापीठाचे उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांनी ३० जून रोजी एक परिपत्रक काढले असून, त्यामध्ये युजीसीच्या ५ जुलै २०१६ मध्ये प्रसिद्ध राजपत्राच्या आधारे हे नियम अद्ययावत करत असल्याचे सांगितले आहे. जुन्या अटींमध्ये प्राध्यापक असल्यास पीएच.डी. नंतर तीन वर्षे आणि नियुक्तीच्या वेळेस पीएच.डी असल्यास पाच वर्षांनी मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळत होती. आता तशी अट राहणार नाही.

एम.फील. मार्गदर्शकासाठीच्या अटी -

- विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संबंधित संस्थेत नियमित प्राध्यापक असल्यास पाच शोधनिबंध करस्पॉंडींग ऑथर म्हणून प्रसिद्ध असावेत

- सहयोगी किंवा सहाय्यक प्राध्यापक असल्यास पीएच.डी. आणि दोन शोधनिबंध आवश्यक

पीएच.डी. मार्गदर्शकांच्या अटी -

- विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संबंधित संस्थेत नियमित प्राध्यापक असल्यास स्वतःचे पाच शोधनिबंध प्रसिद्ध असावेत

- सहयोगी किंवा सहाय्यक प्राध्यापक असल्यास पीएच.डी. आणि दोन शोधनिबंध आवश्यक

- जास्तीत जास्त दोन विषयांसाठी मार्गदर्शक बनू शकतात

- वयाच्या ६० पर्यंत मार्गदर्शक म्हणून काम करू शकतात. परंतु, निवृत्तीच्या दोन वर्ष आधीपर्यंतच नवीन विद्यार्थी स्वीकारू शकता त्यानंतर नाही.

हेही वाचा: आरक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल; बाबा आढाव

निर्णयाचे फायदे -

- मार्गदर्शक बनण्यासाठी अनेक प्राध्यापकांना संधी उपलब्ध होईल

- मार्गदर्शकांची संख्या वाढल्यामुळे जास्त विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळतील

- सहाय्यक प्राध्यापकांसाठी आता पीएच.डी. अनिवार्य असल्याने पात्रतेसाठी विद्यार्थ्यांना फायदा

- महाविद्यालय स्तरावरही संशोधनाला वाव मिळेल

विद्यापीठाने आदेश काढले आहेत पण त्याची प्रक्रिया अजून सुरू झाली नाही. ती तातडीने सुरू करायला हवी. तसेच वयाच्या ६० पर्यंत प्राध्यापकांना नवीन विद्यार्थी घेण्यासाठी परवानगी द्यायला हवी.

- प्रा. डॉ. अजय दरेकर, अध्यक्ष, भारतीय इलेजिबल स्टुडंट्स टीचर्स असोसिएशन

विविध कारणांमुळे राज्यात प्राध्यापक आणि मार्गदर्शकांची संख्या कमी झाली आहे. त्यात पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही या काळात वाढली आहे. मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांची व्यस्त प्रमाणामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या नावाजलेल्या विद्यापीठात अनेकांना पीएच.डी. करण्याची इच्छा असते. अशा निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

- डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

loading image