Video : हिरवे-हिरवे गार गालिचे; पिंपरी-चिंचवडमध्ये फुलांचा बहर

Video : हिरवे-हिरवे गार गालिचे; पिंपरी-चिंचवडमध्ये फुलांचा बहर

पिंपरी : 'हिरवे-हिरवे गार गालिचे...हरित तृणाच्या मखमालीचे...' या त्र्यबंक बापूजी ठोंबरे (बालकवी)यांच्या काव्य पंक्तीची लॉकडाउनमध्ये प्रचिती येत आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी सध्या प्रदूषण विरहीत असल्याने शहरात सौंदर्यांने कात टाकली आहे. नागरिकांना तणाव मुक्तीतून दिलासा देणारे हे फुलांचे बहावे, गुलमोहर, नीलमोहर, बोगनवेल, पळस, गोल्डनशॉवर, जारुल हे गालिचे मनाला मोहून टाकत आहेत.

शहरात उद्योगधंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरवळ व फुलांचा बहर नजरेस पडला नाही. सध्या ठिकठिकाणी फुलांचे ताटवे नजरेस पडत आहेत. रस्त्यावरही दुपारच्या प्रहरात फुलांचे गालिचे मनाला आनंद देत आहे. विविधरंगी गुलाबी, पांढरे, पिवळे, लाल फुले पाहण्यासाठी नागरिकांची आपसूकच पावले थांबत आहेत.

उद्यान विभागाचे प्रमुख दत्तात्रय गायकवाड शहरातील सौंदर्याबद्दल बोलताना म्हणाले, ' हवेतील कार्बनचे प्रमाण कमी झाल्याने शुद्ध ऑक्‍सिजनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यावरील उष्मा कमी झाल्याने वनस्पतींची पोषक वाढ झाली आहे. नागरीक सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅमेऱ्यात क्षणचित्रे कैद करून बदलत्या मोसमाचा आनंद घेत आहेत.'


कुठे आहेत हे आल्हाददायक दृश्‍य...
शहरात नवी सांगवी नर्मदा गार्डन परिसरात फुलांचे शूटिंग नागरीक करत आहेत. या भागातील हलका गुलाबी म्हणजेच 'टॅबुबिया' फुले लक्ष वेधून घेत आहेत. त्याचप्रमाणे औंध रावेत परिसरातही हेच दृश्‍य नजरेस पडत आहे. तणावमुक्तीतून मनाला आनंद देणारा हा नजारा सर्वांना मोहनी घालत आहे. टेल्को एसकेएफ रोड येथील पांढरी बोगनवेल व इंद्रायणीनगर येथील 'नीलमोहर' सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राधिकरणातील विविधरंगी 'पळस' देखील जाता-येता सर्वांना खुणावत आहे. रस्ता दुभाजकातील 'बहावा' कधी नव्हे तो मोठ्या प्रमाणात फुलला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com