Water Level : पुनर्भरणामुळे वाढली भूजल पातळी; जिल्ह्यातील १०३ दुष्काळी गावांमध्ये प्रयोग यशस्वी

राज्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
Water Level
Water Levelsakal

पुणे - भूजल पातळी वाढविण्यासाठी कूपनलिका पुनर्भरण हा उत्तम पर्याय ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील १०३ दुष्काळी गावांमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते ३० सेंटिमीटरने पाण्याची पातळी वाढली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागाने या संदर्भातील अहवाल जिल्हा परिषदेकडे सुपूर्त केला आहे.

राज्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कूपनलिका पुनर्भरण किंवा विहीर पुनर्भरण (रिचार्ज शाफ्ट) करण्यात आले होते. त्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली का नाही?, यासंबंधीचा आढावा विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागातील डॉ. भावना उम्रीकर यांनी शास्त्रीय पडताळणीद्वारे घेतला आहे.

यासंबंधीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुपूर्त केला असून, सुरुवातीच्या निरीक्षणांमध्ये पावसाची तूट असतानाही भूजल पातळीत चांगली सुधारणा झालेली दिसत आहे.

असा आहे प्रकल्प...

  • जिल्ह्यातील दुष्काळप्रवण १०३ गावांची योजनेसाठी निवड

  • त्यातील ७१ ठिकाणी प्रत्यक्ष रिचार्ज शाफ्टची पाहणी

  • जिल्हा परिषदेकडून वर्षभरात ७१ कूपनलिका पुनर्भरण पूर्ण

  • गावातील खोलगट ठिकाणी किंवा नदीपात्रात कूपनलिका

निष्कर्ष....

  • यंदा केलेल्या पहिल्या पडताळणीत १५ ते ३० सेंटीमीटरने भूजल पातळी वाढल्याचे स्पष्ट

  • पावसाची तूट असतानाही सरासरीपेक्षा जास्त भूजल पातळी

  • कूपनलिका पुनर्भरणाची रचना फायदेशीर ठरते

  • पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या कामांसाठी उपयोग

संशोधकांच्या सूचना...

  • पुढील दोन वर्षे सातत्याने नोंदी घेणे आवश्यक

  • नदीपात्रातील पुनर्भरण कूपनलिकेच्या संरक्षणाची गरज

  • दुष्काळी भागातील टॅंकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर किती परिणाम झाला, याचा अभ्यास गरजेचा

पुनर्भरण कूपनलिका

1) पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण

2) कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा

3) खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूने चार-पाच मिलिमीटर व्यासाची छिद्रे पाडावीत व काथ्या गुंडाळावा

4) खड्ड्यांत सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी

पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांची कूपनलिका पुनर्भरणासाठी निवड केली. जिल्हा परिषदेच्या निधीतून ही योजना राबविली होती. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असतानाही येथील भूजल पातळी १५ ते ३० टक्के वाढली आहे.

- आयुष प्रसाद, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com