पुण्यात टोळक्‍याकडून दाम्पत्यावर कोयत्याने वार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

टोळक्‍याने दहा वाहनांची तोडफोड करुन नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वानवडीतील महम्मदवाडी परिसरात गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

पुणे : घरासमोरील रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना तोडफोड करण्यास मज्जाव करणाऱ्या दाम्पत्यावर टोळक्‍याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. टोळक्‍याने दहा वाहनांची तोडफोड करुन नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना वानवडीतील महम्मदवाडी परिसरात गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी उद्धव एडके (वय 26, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महम्मदवाडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या आई-वडीलांसमवेत महम्मदवाडीतील साठेनगर परिसरात राहतात. गुरूवारी पहाटे फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय झोपले होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या परिसरामध्ये लावलेले पाच दुचाकी, एक टेम्पो, दोन रिक्षा, दोन कार यांसारख्या वाहनांची पाच जणांच्या टोळक्‍याने तोडफोड केली. त्याच्या आवाजाने जाग येऊन फिर्यादींचे आई-वडील बाहेर आले, त्यावेळी फिर्यादींच्या गाडीची तोडफोड केली जात होती. तेव्हा फिर्यादींच्या आई-वडीलांनी टोळक्‍यास आमची गाडी फोडू नका, असे बजावले. त्याचा राग आल्याने टोळक्‍याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले.

या घटनेमध्ये दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यानंतर टोळक्‍याने आरडाओरडा करीत, कोयते फिरवून नागरीकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: group of unknown people attacks on couple in Pune