
बारामती : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून (ता. 23) बारामतीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज हा निर्णय घेतला.
उपविभागीय अधिका-यांच्या दालनात आज झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, डॉ. सदानंद काळे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, संभाजी होळकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील सूर्यनगरी व गणेश मंडई परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील सर्व व्यवहार, दुकाने बंद राहणार आहेत. हा निर्णय घेण्याअगोदर उपविभागीय अधिका-यांनी व्यापा-यांची बैठक बोलावून त्यांनाही या बाबत विश्वासात घेत पूर्वकल्पना दिली. सूर्यनगरी व मंडई परिसर हा हॉटस्पॉट ठरला आहे.
संध्याकाळी सातनंतर बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही व्यवहार सुरु राहणार नाहीत, लोकांनीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येऊ नये, विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. जे दुकानदार सॅनेटायझर, ग्राहकांच्या नोंदी तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. हॉटेल चालकांना संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मास्कसंदर्भात पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान आजपासून पोलिस ही कारवाई वेगाने करणार आहेत. दुसरीकडे एमआयडीसी परिसरातही रुग्ण वाढू लागल्याने त्या बाबत उपविभागीय अधिकारी उपाययोजना करणार आहेत.
उद्यापासून नटराज नाट्य कला मंडळ तिसरे कोविड केअर सेंटर तारांगण वसतिगृहाशेजारी सुरु करणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली. नटराजच्या दोन कोविड केअर सेंटरची 200 रुग्णांची क्षमता संपल्याने आता तिसरे सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे गुजर म्हणाले. मेडीकल कॉलेज, नटराजची दोन्ही सेंटर्स, सिल्व्हर ज्युबिली व रुई ग्रामीण रुग्णालय सध्या हाउसफुल्ल अवस्थेत आहे. त्या मुळे आता तिसरे सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान, शहरात अधिग्रहीत केलेल्या सोळा रुग्णालयांची स्वताः डॉ. काळे व डॉ. मस्तुद उपविभागीय अधिका-यांच्या उपस्थितीत जागेवर जाऊन पाहणी करणार आहेत. ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाही अशा रुग्णांना जनरल वॉर्डात हलवून तेथे ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते अशा रुग्णांसाठी बेड रिकामे करण्याचा हा प्रयत्न असेल.
दरम्यान, शहरातील हातगाडेचालक, फेरीवाले यांच्याही आरटीपीसीआर तपासण्या करण्याचा निर्णय झाला आहे. बारामती शहरातील साडेसातशे फेरीवाल्यांची यादी काढण्यात आली असून त्यांच्याही तपासण्या केल्या जाणार आहेत.
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बारामतीतील तपासणीबाबत...गेल्या काही दिवसात बारामती नगरपालिकेने युध्दपातळीवर सर्वेक्षण करत शहरातील जवळपास 80 हजार लोकांची तपासणी केली आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी शहरात नगरपालिका भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर घेणार आहे. या माध्यमातून औषधफवारणी केली जाणार आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.