
कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही. ससून रुग्णालयात त्याच्या क्षमतेइतके रुग्ण दाखल झाले आहेत.
पुणेकरांनो, कोणतीही घ्या, पण लस घ्याच!
पुणे : भारत बायोटेकचे ‘कोव्हॅक्सिन’ असो की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ‘कोव्हिशिल्ड’, कोणतीही लस असली तरीही ती घ्या. कारण, लस घेतल्याने कोरोना झाला तरीही त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होणार नाही. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागणार नाही, अशी माहिती शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
कोरोना लसीकरण सुरू होऊन आता ६३ दिवस झाले आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि नंतरच्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर यांना ही लस देण्यात आली. यातील बहुतांश जणांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. पण, त्यापैकी काही जणांना कोरोना झाल्याचे दिसते. त्यामुळे लशीच्या परिणामकारकतेबद्दलची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
- जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण; कोरोनाचा कहर सुरूच
भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत रुग्णालयात कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या २७ रुग्णांचे विश्लेषण करण्यात आले. त्यात एकही रुग्णाने लस घेतली नाही. लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला तरीही त्याची तीव्रता कमी असते. रुग्ण अत्यवस्थ होऊन त्याला उपचारासाठी व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत नाही.’’
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या
कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही. ससून रुग्णालयात त्याच्या क्षमतेइतके रुग्ण दाखल झाले आहेत. महापालिकेतील रुग्णालयांमध्येही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमिवर रुग्णसंख्या कमी करण्यासाठी, अत्यवस्थ रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- लॉकडाउन नको; मग शिस्त पाळाच!
गेल्यावर्षी काय होते?
गेल्यावर्षी कोरोनाचा उद्रेक झाला, त्यावेळी हा आजार अगदीच नवा होता. त्यावर कसे आणि कोणते उपचार करायचे, याची नेमकी माहिती नव्हती. हायड्रोक्सीक्लोरोक्विनपासून ते रॅमडेसिव्हीरपर्यंत वेगवेगळी औषधे डॉक्टरांनी रुग्णांना दिली. पण, त्याचा नेमका काय परिणाम होतोय, हे बघून उपचाराची पुढची दिशा निश्चित केली जात होती. गेल्यावर्षी लॉकडाउन होते आणि सगळ्यात महत्त्वाचे कोरोना प्रतिबंधक लस नव्हती.
यंदा काय आहे?
वर्षभरात आपल्याला आजाराचे स्वरूप नेमकेपणानं कळले. रुग्णांवर आधीपेक्षा खूप चांगल्या प्रकारे उपचार होत आहेत. तसेच, प्रतिबंधक लसीचे प्रभावी अस्त्र आपल्या भात्यात आहे.
- ऑनलाइन ‘पिफ’ला देशभरातून प्रतिसाद
वयाची पंचेचाळीशी ओलांडलेल्या प्रत्येकाला लस देण्याचा प्रयत्न सरकारने करावा. लस पुरवठा हा सध्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यासाठी पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये आठ आठवड्याचे आंतर ठेवावे. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येला लस देणे शक्य होईल. इंग्लंडमध्ये याच धर्तीवर लसीकरण होत होते.
- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल, पुणे
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लस हेच प्रभावी आयुध आपल्याकडे आहे. त्याचा पूर्णक्षमतेने वापर केला पाहिजे. विशेषतः सहव्याधी असलेल्यांनी तर लस घेणे आवश्यक आहे.
- डॉ. सचिन गांधी, वैद्यकीय तज्ज्ञ
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Medical Experts Pune City Advised Take Any Corona Vaccine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..