जीएसटीला ‘डॅम इट’ कसे म्हणता? - निर्मला सीतारामन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

तर स्वदेशी महागड्या वस्तू खरेदी करा 
चीनमधील उत्पादनांमुळे भारतीय वस्तूंना मागणी कमी असल्याने देशातील वस्तू खरेदी करण्यासाठी सरकारचा आग्रह का नाही, या प्रश्‍नावर सीतारामन म्हणाल्या, ‘‘एकाच वस्तूची चीन आणि भारतातील उत्पादन प्रक्रिया भिन्न असते. त्यानुसार त्याची किंमत ठरते. चीनमधून कच्चा माल मागवून इथे त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून रोजगारही निर्माण होतो. तुमचा भारतीय उत्पादनांसाठी आग्रह व देशप्रेम असेल, तर देशात तयार होणाऱ्या महागड्या वस्तू खरेदी करा.’

पुणे - वस्तू व सेवा कराला (जीएसटी) देशाच्या संसदेबरोबरच सर्व राज्यांनी मान्यता दिली आहे. त्यात त्रुटी असतील तर सुधारणा करू; परंतु तो कायदाच ‘डॅम इट’ आहे, असे म्हणून त्याची खिल्ली कशी उडवू शकता, असा संतप्त सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला.

चंद्रकांतदादा पाटील मित्र परिवारातर्फे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांनी सनदी लेखापाल (सीए), बॅंक व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली. या वेळी ‘कॉस्ट अकाउंटंट असोसिएशन ऑफ पुणे’चे प्रतिनिधी बी. एम. शर्मा यांनी ‘जीएसटी’ हा चांगला कायदा आहे; परंतु त्यामध्ये अनेक अडचणी येत असल्याने सर्वजण त्रस्त आहेत, अशी तक्रार केली. हा रोख न आवडल्याने सीतारामन यांनी त्यांना मध्येच रोखले. त्या म्हणाल्या, ‘‘जीएसटीची अंमलबजावणी दोनच वर्षांपासून सुरू झाली आहे. त्यातील त्रुटी बाजूला करून सुधारणा केली जात आहे. परंतु, संसदेत मान्य झालेल्या कायद्याला तुम्ही ‘डॅम इट’ कसे म्हणू शकता? हा सर्वांनी मान्य केलेला कायदा आहे. तुम्ही २३ ऑक्‍टोबरला शिष्टमंडळासह दिल्लीत या आणि तुमच्या काही सूचना असतील, तर त्यावर चर्चा केली जाईल.’’ तसेच, सीतारामन यांनी त्यांच्या स्वीय साहाय्यकाला शर्मा यांचा संपर्क क्रमांक घेण्याची सूचनाही केली. 

या कार्यक्रमात एकूण देशांर्तगत उत्पन्नाची (जीडीपी) भिन्न आकडेवारी, आयात वस्तूंबाबतचे धोरण, बाजारपेठेतील मंदी, बीएसएनएल व एमटीएनएल कंपन्या आदींबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. यावर सीतारामन म्हणाल्या, ‘‘जागतिक आर्थिक स्थिती व आकडेवारीनुसार देशाचा ‘जीडीपी’ खासगी संस्था सांगतात. परंतु, केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पाच्या वेळीच सरकारी आकडा जाहीर केला जातो. त्यामुळे सरकारी व खासगी संस्थांच्या आकडेवारीत तफावत दिसते. याचबरोबर बीएसएनएल व एमटीएनएलच्या समस्येवर मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे.’’ या वेळी भाजपचे सचिव राजेश पांडे, संयोजक डॉ. राजेंद्र हिरेमठ उपस्थित होते.

लिंबाने पूजा केली तर काय बिघडले? 
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी विजयादशमीच्या दिवशी राफेल विमानावर ओम लिहून, नारळ आणि लिंबाने पूजा केली तर काय बिघडले, ही अंधश्रद्धा नसून, परंपरेचा भाग आहे. यात काहीच गैर नाही, असे सीतारामन यांनी ठामपणे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘विजयादशमीनिमित्त भारतीय परंपरा आणि संस्कृतीनुसार ही पूजा करण्यात आली. त्यात अंधश्रद्धेचा विषय येत नाही. लिंबू-मिरचीने पूजा केली म्हणजे आमच्या सरकारला वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, असे होत नाही. त्यामुळे ही चर्चा निर्रथक आहे.’’

पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, की पंजाब व महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेबाबत (पीएमबी) मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे. खातेधारकांना लवकर पैसे मिळावेत यादृष्टीने मार्ग काढण्याचा सूचना त्यांना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना तात्पुरती मदत करण्यात आली आहे. , असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.  

शेतमालासाठी गोदामांची गरज
चांगला भाव मिळेपर्यंत शेतकरी कांदा साठवून ठेवतात; परंतु चांगली गोदामे नसल्याने कांदा खराब होतो. त्यामुळे कांद्यासारख्या पिकांची प्रक्रिया करुन अनेक दिवस साठवणूक करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यास भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरला सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले.

जीएसटी संकलनवाढीसाठी समिती 
कर्नाटक, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेशासह इतर राज्यांत निर्माण झालेल्या पूरस्थितीसह अन्य कारणांनी वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) संकलन घटले आहे. संकलनवाढीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती चार दिवसांपूर्वीच नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्याआधारे उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST nirmala sitharaman