वृक्षमित्रांकडून झाडांचे पालकत्व

सागर शिंगटे
रविवार, 7 मे 2017

प्राधिकरणातील अडीचशे देशी झाडांच्या संगोपनासाठी पुढाकार

प्राधिकरणातील अडीचशे देशी झाडांच्या संगोपनासाठी पुढाकार
पिंपरी - "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे'.. हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग सर्वार्थाने सार्थकी लावत मोशी आणि भोसरी- इंद्रायणीनगर प्राधिकरणामधील सुमारे सव्वाशे वृक्षमित्रांनी जवळपास अडीचशे देशी झाडांचे पालकत्व घेतले आहे. रस्त्यांवरील झाडांबरोबरच सोसायट्यांमधील जुन्या झाडांचेही त्यांच्याकडून संगोपन केले जात आहे.

"वृक्षमित्र' परिवाराचे प्रशांत राऊळ, महेश पवार, रवी राजपूत, शरद सोनवणे, रवी कलमाडी यांच्यासारख्या काही वृक्षमित्रांनी मोशी प्राधिकरणातील "पीसीएनटीडीए' सर्कल येथे पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या सहकार्याने जून 2016 मध्ये पर्यावरणदिनी 20 ते 25 रोपट्यांची लागवड केली. पुढे याच उपक्रमात आणखी लोक जोडले गेले. त्यामुळे, वृक्षमित्र परिवाराच्या सदस्यांनी उद्यान विभागाला पत्र लिहून तेथील झाडांचे पालकत्व घेण्याची हमी आणि जबाबदारी दर्शविली. परंतु, जादा झाडे लावण्यासाठी माती, रोपे आणि संरक्षक जाळ्या यासाठी अधिक खर्च येत होता, त्यासाठी उद्यान विभागाने त्यांना मदत केली.

वृक्षमित्र परिवाराचे प्रशांत राऊळ आणि शरद सोनवणे म्हणाले, ""मोशी प्राधिकरणातील पेठ क्र. 4, 6, 9, 11 आणि 13, तर भोसरी- इंद्रायणीनगर प्राधिकरणातील पेठ क्र. 3 आणि 7 येथे आत्तापर्यंत अडीचशे देशी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आवळा, फणस, बेहडा यांसारख्या झाडांचा अंतर्भाव आहे. या बहुतेक सर्व झाडांचे वृक्षमित्रांनी पालकत्व घेतले आहे. काही झाडांवर तशी माहिती असलेले नामफलकही लावण्यात आले आहेत. उर्वरित झाडांवरही त्या प्रकारचे फलक लावण्यात येणार आहेत. पालकत्व घेतलेल्यांकडून झाडाला आधार देणे, लेंडीखत - शेणखत टाकणे, गोमूत्र फवारणी यासारखी कामे केली जात आहेत. त्यासाठी पतंजलीचे मारुती पवार, सुनील आवटी, दीपक बोराटे, सुनील लांडगे, डी. एस. राठोड यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळत आहे.''

सोसायट्यांमधील जुन्या झाडांचेही संगोपन
श्रीकृष्णनगरी, ग्लोरिअस पार्क (पेठ क्र. 3), केतन पॅराडाईज (पेठ क्र. 6), कृष्णा हेरिटेज (पेठ क्र. 7) येथील जुन्या झाडांचीही वृक्षमित्र काळजी घेत आहेत. कृष्णा हेरिटेज येथे फळझाडे लावण्यात आली आहेत. तेथे सर्कल आणि इतर झाडांना पाणी घालण्यासाठी 40 हून अधिक कॅनची सोय करण्यात आली आहे.

Web Title: guardianship by tree friend