esakal | कोरोनाच्या सावटात गुढीपाडवा; सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

बोलून बातमी शोधा

gudi padawa

गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालयाने केले आहे.

कोरोनाच्या सावटात गुढीपाडवा; सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - गुढीपाडव्यावर गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाच्या साथीचे सावट आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून उच्चांकी संख्येने कोरोनारुग्णांची नोंद होत आहे. यामुळेच गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालयाने केले आहे. यासाठी सोमवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

सध्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण गेल्या वर्षी पेक्षा जास्त वाढत होत. त्यामुळे गुढीपाडव्याचा सण अत्यंत साधेपणाने उद्या सकाळी सात वाजेपासून रात्री आठ वाजण्यापूर्वी साजरा करणे अपेक्षित आहे. राज्यात काही ठिकाणी पारंपरिक वेशभूषा करून तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. मात्र विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी यावर्षी पालखी, दिंडी, प्रभात फेरी, मोटारसायकल फेरी व मिरवणुका काढू नये व कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

हे वाचा - उद्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाउन’? पंधरा दिवस पुन्हा टाळेबंदीचे संकेत

मार्गदर्शक सूचना
- सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सुरक्षित अंतर व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरगुती गुढी उभारावी
- गुढीपाडव्यानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील
- आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोरोनाविषयक सर्व उपाययोजना कराव्यात
- सरकारच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे
- प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत शासनपातळीवरुन आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील पालन करावे 

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुण्यात दोन दिवस जमावबंदी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. या दोन्ही दिवशी मिरणुका, सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच या दोन्ही दिवशी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, महापालिकेकडून हे आदेश काढण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.