गुंजवणी पुनर्वसनाचे शिक्के उठणार कधी?

Gunjavani
Gunjavani

परिंचे (पुणे) : गुंजवणी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या पुरंदर तालुक्‍यातील सोळा गावांवर पुनर्वसनाचे शिक्के बसले आहेत. त्यामुळे कर्जमाफीसह आणेवारी लावणे, खातेफोड करणे ही कामे प्रलंबित आहेत. गेली 25 वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्‍न नवीन सरकारकडून मार्गी लागण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत आहे.

गुंजवणी धरण दोन टीएमसी क्षमतेचे आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. पुरंदरमधील दुष्काळी भागातील सोळा गावांना ही योजना लाभदायक ठरणार होती. त्या काळात 90 टक्के धरणाचे काम पूर्ण करण्यात आले होते. राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून उर्वरित 10 टक्के काम पूर्ण करण्यात आले. याच काळात संपूर्ण तालुक्‍याला गुंजवणीच्या पाण्याचे स्वप्न दाखविण्यात आले होते. आरक्षणाचे शिक्के 16 गावांवर आणि पाणी मात्र संपूर्ण तालुक्‍याला कसे, असा सवाल बाधित शेतकरी व या प्रश्‍नाचे अभ्यासक शरद जगताप यांनी विचारला आहे.

16 ऑगस्ट 1994 रोजी सरकारच्या आदेशानुसार गुंजवणी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या पुरंदर तालुक्‍यातील 16 गावांमधील जमिनीवर पुनर्वसनाच्या आरक्षणाचे शिक्के लागू झाले. तेव्हापासून आठ एकरांवरील खातेफोड बंद करण्यात आली. जमीन खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाले. 16 गावांतील शेकडो शेतकरी कर्जमाफीसारख्या अनेक योजनांपासून वंचित आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुरंदरचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सचिन लंबाते यांनी कार्यकर्त्यांसह या सोळा गावांमधील शिक्केबाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तत्कालीन पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून हा प्रश्न तातडीने सोडविणार असल्याची घोषणाही केली होती.
दरम्यान, गुंजवणी धरणग्रस्तांनी पुरंदरमधील जमिनी नाकारलेल्या असूनदेखील या जमिनीवरील आरक्षणाचे शिक्के गेल्या पंचवीस वर्षांपासून निघाले नाहीत. हे शिक्के निघणार कधी आणि आम्हाला न्याय मिळणार कधी, अशा आशेवर शेतकरी बसले आहेत.


पीककर्ज व अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येत नाही. गेल्या 25 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, अनेक राजकीय पक्षांनी या प्रश्नाचे फक्त भांडवल केले आहे.
- शरद जगताप, बाधित शेतकरी


आयुक्तांबरोबर याविषयी दोन वेळा बैठक झाली आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रश्न लांबणीवर पडला असून, भविष्यात आणखी आक्रमकपणे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सचिन लंबाते, अध्यक्ष, भाजप, पुरंदर तालुका


आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून नवीन सरकारकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- मयूर मुळीक, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा कॉंग्रेस

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com