हडपसर येथील मुख्य बसथांब्यासह परिसरातील सर्वच थांबे ऑटो रिक्षांच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Auto Rickshaw problems in Hadapsar News

Hadapsar News: हडपसर येथील मुख्य बसथांब्यासह परिसरातील सर्वच थांबे ऑटो रिक्षांच्या विळख्यात

Hadapsar News- गाडीतळ येथील मुख्य बसथांब्यासह परिसरातील सर्वच थांबे ऑटो रिक्षांच्या विळख्यात सापडले आहेत. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह इतर वाहनांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

काही रिक्षाचालकांचे गैरवर्तन, उद्दामपणा यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पीएमपीएलचे अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांना पत्र देऊन बस थांब्यावर थांबणाऱ्या ऑटोरिक्षांवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. मात्र हडपसर परिसरात हे आवाहन अद्याप भेदखल झालेले दिसत आहे.

थेट बस थांब्यावर थांबणाऱ्या ऑटोरिक्षा तेथेच थांबून प्रवासी घेत असल्याचे चित्र आजही पाहवयास मिळत आहे. रिक्षाचालकांच्या या आडमुठेपणामुळे थांब्यावर बस उभी राहण्यास जागा मिळत नाही. भर रस्त्यात बस थांबवावी लागते. इतर वाहने व प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

थांब्यापासून १०० मीटर पर्यंत रिक्षा थांबविल्या जाऊ नये, असा नियम असतानाही येथील गाडीतळाचा मुख्य बसथांबा चोहबाजूनी रिक्षा थांब्यांनी ग्रासला आहे.

थांब्यावर येणाऱ्या प्रवाशांना या रिक्षांच्या गर्दीतून वाट काढत जावे लागत आहे. रिक्षाचालक येथे घोळक्यांनी उभे राहिलेले असतात. त्यांच्या विविध विषयांवरील गप्पा, आरडाओरडा यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांची मोठी कुचंबना होत असते.

गाडीतळच्या मुख्य थांब्यालगत मागील बाजूस थेट रस्त्यावर कायम वीस-पंचवीस ऑटोरिक्षा उभ्या असतात. डाव्या बाजूला थांब्याच्या समोर बस ऐवजी रिक्षाच थांबलेल्या असतात. या चौकात आठ ते दहा ठिकाणी रिक्षांचे अनाधीकृत थांबे आहेत.

सोलापूर रस्ता, सासवड रस्ता व हडपसर परिसरातील बसथांब्यावर मागे-पुढे रिक्षा एकापुढे एक उभ्या राहिलेल्या असतात. मात्र, वाहतूक पोलीस किंवा आरटीओकडून त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. झालीच तर ती केवळ नावापुरतीच असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

'परिसरातील अधिकृत व अनाधीकृत रिक्षाथांब्यांची माहिती जमा करण्यात येत आहे. हडपसर वाहतूक शाखेअंतर्गत सोळा अधिकृत थांबे आहेत. अनाधिकृत थांब्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अनाधिकृत थांब्यावर कारवाई केली जाणार आहे.'

- बाळासाहेब मुऱ्हे, पोलीस अधिकारी, हडपसर वाहतूक शाखा

'रिक्षा चालकांना अनेक वेळा सांगूनही ते ऐकत नाहीत. आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून दमदाटी होते. वारंवार वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. पोलिसांनी कारवाई केल्यावर या रिक्षा तेवढ्यापुरत्या बाजूला होतात मात्र, काही वेळातच त्या बस थांब्यावर पुन्हा कब्जा करीत असतात.

पीएमपीएल अध्यक्षांनी याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार वाहतूक पोलीस, आरटीओ व पीएमपीएल अधिकाऱ्यांच्या पथकाकडून अशा अनधिकृत रिक्षाथांब्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.'

- समीर आत्तार, डेपो मॅनेजर हडपसर