Hadapsar News : गाडीतळ बस स्थानकातील ऑटोरिक्षांचा विळखा सुटता सुटेना

काही मुजोर रिक्षाचालक, वाहतूक पोलीस व पीएमपी प्रशासनाकडून कारवाईबाबत होणारा कानाडोळा आणि हतबल प्रवासी यामुळे येथील बस स्थानकाला बसलेला ऑटो रिक्षाचा विळखा काही सुटता सुटत नाही.
Gadital Hadapsar
Gadital Hadapsarsakal

हडपसर - काही मुजोर रिक्षाचालक, वाहतूक पोलीस व पीएमपी प्रशासनाकडून कारवाईबाबत होणारा कानाडोळा आणि हतबल प्रवासी यामुळे येथील बस स्थानकाला बसलेला ऑटो रिक्षाचा विळखा काही सुटता सुटत नाही. त्यामुळे प्रवाशांसह पीएमपी व इतर वाहतुकीलाही वारंवार कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

येथील गाडीतळ मुख्य बसस्थानकाच्या चारही बाजूंनी कायमच ऑटोरिक्षांचा विळखा पडलेला दिसतो. प्रवासी मिळविण्याच्या स्पर्धेत थेट स्थानकात प्रवेश करणाऱ्या रिक्षांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानकातील प्रवासी, बसचालक व वाहक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय थांब्याच्या बाहेरूनही मुख्य रस्त्यावर रिक्षांचा गराडा पडलेला असतो.

त्यामुळे इतर वाहतुकीला वारंवार अडथळा होऊन कोंडी होत असते. या कोंडीतून बाहेर पडताना सुरुवातीलाच बसला अडथळ्यांचे दिव्य पार करावे लागते. त्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी वेळेवर पोहोचता येत नाही. त्याचा मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

इतर खाजगी वाहनचालक किंवा बससाठी येणाऱ्या प्रवाशांनी रिक्षावाल्यास अडथळ्याबाबत विचारल्यास त्यांच्याकडून थेट अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. बस स्थानके किंवा बस थांब्यापासून पन्नास मीटर अंतराच्या आत रिक्षा थांबविण्यास मनाई आहे. मात्र, या नियमाचे हडपसर परिसरात सर्रास उल्लंघन होत आहे.

थेट बस थांब्यावर व स्थानकात घुसून प्रवासी पळविण्याचा प्रकार येथे रिक्षाचालकांकडून होत आहे. एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात वारंवार कारवाई होत असताना वाहतूक कोंडीने सतत हैराण असणाऱ्या हडपसरमध्ये त्याबाबत उदासीनता का दिसत आहे, असा सवाल बस प्रवासी व नागरिकांनी केला आहे.

'हडपसरमध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न असतानाही रिक्षाचालकांकडून व त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या पोलिसप्रशासनाकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. अनाधिकृत रिक्षा थांबे निर्माण झाले आहेत. बसस्थानकाला लागून व थेट बसस्थानकात शिरून प्रवाशी घेतले जात आहेत. पोलिस त्याकडे का दुर्लक्ष करतात, तेच कळत नाही.

याबाबत संघटनेच्या माध्यमातून व वैयक्तीकही अनेकदा तक्रारी करूनही त्याबाबत गांभीर्याने घेतले जात नाही. प्रशासनाने सामान्य माणसांचा विचार केला नाही तर, एक दिवस रोष उफाळून येईल. त्यामुळे संबंधीत प्रशासनाने याबाबत गंभीर भूमिका घेण्याची गरज आहे.'

- पंडित हिंगे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रवासी संघ

'बसस्थानक, बसथांबे भोवती अनाधिकृतपणे उभ्या असणाऱ्या रिक्षांवर पी एम पी व आरटीओ अधिकाऱ्यांच्या दोन पथकांकडून वेळोवेळी कारवाई केली जात असते. हडपसर परिसरात लगेचच अशा कारवाईची वारंवारता वाढवली जाईल.'

- अशोक साबळे, अपघात विभाग प्रमुख, पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com