esakal | हडपसरच्या नागरिकाने घडवली हैदराबादच्या मनोरुग्ण तरुणाची वडिलांशी भेट
sakal

बोलून बातमी शोधा

social

हडपसरच्या नागरिकाने घडवली हैदराबादच्या मनोरुग्ण तरुणाची वडिलांशी भेट

sakal_logo
By
कृष्णकांत कोबल

हडपसर : गेली सहा महिन्यांपासून हैद्राबाद, तेलंगणा येथून बेपत्ता असलेल्या मनोरुग्ण तरुणाच्या वडिलांचा शोध घेऊन त्यांची भेट घडवून आणण्याचे काम येथील एका नागरिकाने केले आहे. पॉल मोहिते असे बाप लेकाची भेट घडवून आणणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पॉल यांच्या या सामाजिक जाणीवेचे कौतुक करीत मनोरुग्ण तरुणाचे वडील व पोलिसांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.

पॉल यांचे हडपसर गाडीतळ परिसरात दुकान आहे. गेली महिनाभरापासून एक मनोरुग्ण तरूण मळलेले कपडे, वाढलेले केस अशा स्वरूपात पॉल यांच्या दुकानात येऊन काहीतरी खायला मागत असे. पॉलही त्याला दररोज जेवन देत असे. दरम्यानच्या काळात त्याच्याशी झालेल्या चर्चेवरून तो मनोरुग्ण असल्याचे पॉल यांना जाणवले. त्यांनी या तरुणाकडून अनेक वेळा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाषेच्या अडसरामुळे त्याची व्यवस्थित माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा: दक्षिण कोरियात मराठी कुटुंबांचा गणेशोत्सव

दरम्यान, एक दिवस पॉल यांनी या तरुणाचे केस कापून आंघोळ घातली. दुसरी कपडे घालून सर्वसाधारण स्वरुपात आणले. त्याला हिंदी व पॉल यांना तेलगू भाषा येत नसल्याने संवादात अडथळा येऊन या तरूणाची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे तेलगूभाषिक व्यक्ती शोधून त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळी मिळालेल्या माहितून त्याचे नाव सत्यनारायण के ( वय ३५, रा. हैद्राबाद, पटांचेरी, तेलंगणा) असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पॉल यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना या तरुणाबाबत माहिती दिली. पॉल यांची धडपड पाहून शिंदे यांनी ही तरुणाच्या नातेवाईकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. खूपवेळा प्रयत्न करून या तरुणांकडून तेलंगणा येथील हैद्राबाद पटांचेरी गावातील त्याचे वडील के चंद्रया यांचा नंबर त्यांना मिळाला.

पॉल व शिंदे यांनी सत्यनारायणचे वडिलांना फोन करून बोलावून घेतले. ते त्यांच्या चार नातेवाईकांना सोबत घेऊन तुळजापूर येथे मुलाचा शोध घेत होते. मुलगा सापडल्याचे समजताच त्यांनी हडपसर कडे धाव घेतली. मुलाला पाहून वडिलांनी गहिवरून आनंदाश्रूंना वाट मोकळी केली. आपल्या मुलाची भेट घालून देणाऱ्या पॉल मोहिते, आकाश देवकर व पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले, "के सत्यनारायण हा तरुण मानसिकदृष्ट्या आजारी आहे. तो मंदिरात जातो असे सांगून तेलंगणा येथील एका गावातून मागील सहा महिन्यांपूर्वी बाहेर पडला होता. सोलापूर, तुळजापूर, चाळीसगाव असे फिरत तो पुण्यात आला होता. हडपसर गाडीतळ येथील पॉल मोहिते यांच्या दुकानात दररोज जेवण मागत होता. पॉल यांनी धडपड करून आमची मदत घेऊन पितापुत्राची भेट घडवून आणली आहे.'

"मला गरजू लोकांची सेवा करायला आवडते. त्याच दृष्टीने सत्यनारायण या तरुणाला मदत करण्याचे ठरविले होते. सुमारे महिनाभर मी त्याचे संगोपन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात पोलिसांना सांगून त्याला त्याच्या वडिलांकडेही सोपविले. तो मनोरुग्ण, भाषेचा अडसर अशा अडचणीतही त्याला त्याचे घरचे मिळाल्याचा आनंद मला होत आहे. घरची सर्व परिस्थिती व्यवस्थित असूनही मानसिक आजारामुळे भरकटलेल्या एकातरूणाला भिकारी होण्यापासून वाचवता आले, याचे मला समाधान वाटत आहे.'

loading image
go to top