महापालिका शाळांची दैना!

संदीप जगदाळे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

हडपसर - सुरक्षारक्षकांची वानवा, तुंबलेली स्वच्छतागृहे, वर्ग खोल्यांची तुटलेली दारे व खिडक्‍या, मैदानावर साचलेला कचरा, काही वर्गांना शिक्षक तर काही शाळा मुख्याध्यापकाविनाच... ही विदारक परिस्थिती आहे हडपसरमधील महापालिकेच्या शाळांमधील. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व आरोग्य धोक्‍यात आहे. 

हडपसर - सुरक्षारक्षकांची वानवा, तुंबलेली स्वच्छतागृहे, वर्ग खोल्यांची तुटलेली दारे व खिडक्‍या, मैदानावर साचलेला कचरा, काही वर्गांना शिक्षक तर काही शाळा मुख्याध्यापकाविनाच... ही विदारक परिस्थिती आहे हडपसरमधील महापालिकेच्या शाळांमधील. परिणामी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व आरोग्य धोक्‍यात आहे. 

हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत महापालिकेच्या एकूण २६ शाळा आहेत. यामध्ये १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर बालवाड्यांमध्ये १६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी माध्यमाच्या २२, इंग्रजी माध्यमाच्या ३ तर उर्दू माध्यमाची १ शाळा असून २४ बालवाड्या आहेत. शहरात सर्वाधिक पटसंख्या याच विभागात आहे. मात्र येथील अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक, सुरक्षारक्षक, शिपाई यांची पदे रिक्त आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. विद्यार्थी व शिक्षकांना पुस्तकाऐवजी वर्ग व परिसराच्या स्वच्छतेसाठी हातात झाडू घ्यावा लागत आहे. मुख्याध्यापक नसल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षकांना वर्ग सोडून मुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. बहुतांश स्वच्छतागृहांत पाणी नाही. दारे, फरशा तुटलेल्या आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने दिवस-रात्र टवाळखोर शाळेच्या प्रांगणात धिंगाणा घालतात.

या बाबत हडपसर-मुंढवा प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांनी सर्व शाळांची पाहणी केली, तसेच सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करून परिसरातील शाळांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ससाणे यांनी परिसरातील शाळेत पुरेसे शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मिळावेत, यासाठी आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.

अनेक पदे रिक्त
या बाबत योगेश ससाणे म्हणाले, ‘‘हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीतील शाळांमध्ये १४ मुख्याध्यापक, ३ पर्यवेक्षक, ६ शिपाई, १० रखवालदार, ५ बालवाडी शिक्षिका, ११ बालवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत. पुरेसे कर्मचारी नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांना वर्ग व शाळा परिसराची स्वच्छता करावी लागत आहे. सुरक्षा नसल्याने शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, याबाबत तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना व्हाव्यात यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या मागणीनुसार सर्व मागण्या शिक्षण विभाग प्राथमिक विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दिले आहे. त्यांनी तातडीने रिक्त पदे भरणे व भौतिक सुविधा पुरविण्यात येतील, असे सांगितले आहे.
- सुरेश उचाळे, सहायक प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. शाळांमधील भौतिक सुविधांसाठी २८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, इमारत दुरुस्ती करण्यात येणार आहे. हडपसरमधील शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मार्च महिन्याच्याअखेरीस सर्व कामे मार्गी लागतील.
- शिवाजी दौंडकर, शिक्षण प्रमुख, महापालिका

Web Title: hadapsar news pune news municipal school