मीटरनुसार भाडे नाकारणाऱ्या रिक्षांवर कारवाई

संदीप जगदाळे
बुधवार, 28 मार्च 2018

हडपसर - मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर हडपसर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. मंगळवारी अशा प्रकारच्या दहा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडे घेण्यास नकार दिला तर प्रवाशांनी तातडीने याबाबत तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असल्याची सामान्य प्रवाशांची तक्रार असते. आता या कारवाईनंतर तरी रिक्षाचालकांवर वचक राहील अशी आशा आहे. या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या पुढेही ही कारवाई सासतत्याने सुरू राहणार असल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जे. डी.

हडपसर - मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर हडपसर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. मंगळवारी अशा प्रकारच्या दहा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच रिक्षा चालकांनी मीटरनुसार भाडे घेण्यास नकार दिला तर प्रवाशांनी तातडीने याबाबत तक्रार करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असल्याची सामान्य प्रवाशांची तक्रार असते. आता या कारवाईनंतर तरी रिक्षाचालकांवर वचक राहील अशी आशा आहे. या कारवाईमुळे रिक्षा चालकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या पुढेही ही कारवाई सासतत्याने सुरू राहणार असल्याचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवासी असल्याचे भासवून साध्या वेशातील वाहतूक पोलिस सध्या भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कठोर कारवाई करीत असून, या विशेष मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांकडून नियमाप्रमाणे दंड वसूल केला जात असून, चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहे. यासाठी हडपसर वाहतूक विभागाने खास महिला व पुरूष पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी साध्या वेशामध्ये विविध भागामध्ये थांबून रिक्षा चालकाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगतात. त्यातून भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांचा शोध घेण्यात येत आहे. 

प्रवासी सविता मोरे म्हणाल्या, भाडे नाकारून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या रिक्षा जप्त करायला हव्यात. रिक्षा स्टॅण्डवर भाडे नाकारले तरच कारवाई करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. परंतु, जेव्हा रिक्षा स्टॅण्डवर पोलिस असतात तेव्हा रिक्षाचालक भाडे नाकारत नाहीत. तर, भाडे नाकारले जाते तेव्हा ट्रॅफिक पोलिसांकडे जाऊन तक्रार करण्याची तसदी प्रवासी घेत नाहीत. त्यामुळे या रिक्षाचालकांवर कारवाई होत नसल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे अशा रिक्षाचालकांच्या विरोधातील तक्रारी सातत्याने वाढत आहेत.

वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक डी. व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक जे. डी. कळसकर यांनी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली असुन, विना मीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. पहिव्या दिवशी दहा रिक्षा चालकांवर कारवाई झाली असून, त्यांच्याकडून ३३०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. अशा रिक्षा चालकांचे वाहन परवाने रद्द करण्याचा प्रस्तावही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

Web Title: hadapsar pune auto rickshaw permit police