अर्धा किलो वजन अन्‌ कमी बिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

पुणे - कमीत कमी अर्धा किलो वजन... बिया कमी अन्‌ जास्त गर... असा ‘रायपूर पेरू’ सध्या लक्ष वेधून घेत आहे. शहरात विविध फळ विक्रेत्यांकडे हा पेरू सध्या विक्रीला दिसत आहे. मार्केट यार्डातील फळांच्या घाऊक बाजारातही त्याची आवक चांगली होत आहे.

पुणे - कमीत कमी अर्धा किलो वजन... बिया कमी अन्‌ जास्त गर... असा ‘रायपूर पेरू’ सध्या लक्ष वेधून घेत आहे. शहरात विविध फळ विक्रेत्यांकडे हा पेरू सध्या विक्रीला दिसत आहे. मार्केट यार्डातील फळांच्या घाऊक बाजारातही त्याची आवक चांगली होत आहे.

स्थानिक भागात ‘सरदार’, ‘लखनऊ ४९’ या जातीच्या पेरूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गुलाबी गर असलेला, उभट आणि गोल आकाराच्या पेरूचेही उत्पादन स्थानिक भागात होते. परंतु त्याचे प्रमाण तुलनेत कमी असते. गेल्या तीन- चार वर्षांपासून उत्तर पूर्व भारतातील राज्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या पेरूची पुण्यातील बाजारात आवक होत आहे. खरबुजाएवढा आकाराने मोठा असलेला हा पेरू हळूहळू बाजारपेठ मिळवू लागला आहे. पुणे जिल्ह्यात बारामती, कोल्हापूर जिल्ह्यातही या पेरूचे उत्पादन घेण्यास काही शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. त्यामुळे पेरूची बाजारातील आवक वाढत आहे. या पेरूंचा हंगाम सुरू झाला असून, सध्या ५० ते ६० क्रेट्‌स (प्रति २० किलोचा एक क्रेट) एवढी आवक होत आहे. त्याला साधारणपणे प्रति किलोला ५० ते १२० रुपये इतका भाव मिळत आहे.

गुणकारी फळ 
पेरूमध्ये अ, क, के, ब ही जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. नियमितपणे खाल्ल्यास त्वचा, डोळे चांगले राहतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

आपल्याकडील बाजारात स्थानिक पेरूची आवक मोठ्या प्रमाणावर होते. ‘रायपूर पेरू’ची आवकही वाढू लागली आहे. या पेरूमध्ये गर जास्त आणि बियांचे प्रमाण कमी असते. चवीला कमी गोड असला, तरी खवय्यांकडून त्याला अधिक पसंती मिळत आहे. 
- सुनील बोरगे, व्यापारी

Web Title: Half kg and less seeds

टॅग्स