दिव्यांगांनी क्रीडा क्षेत्रात करिअर करावे - दीपा मलिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

पुणे - 'संघर्ष मलाही करावा लागला. 27 वर्षे व्हीलचेअरवर असूनसुद्धा जिद्दीच्या जोरावर लढले आणि ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले. प्रत्येक खेळाडूने अशीच आशा ठेवून लढले पाहिजे. आम्हा दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्राने खूप काही दिले आहे. अशाच यशस्वी वाटचालीसाठी आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूंनी पुढे येऊन क्रीडा क्षेत्रात करिअर करावे,'' असे आवाहन "रिओ पॅरा ऑलिंपिक'मधील पदक विजेत्या खेळाडू दीपा मलिक यांनी शनिवारी केले.

पुणे - 'संघर्ष मलाही करावा लागला. 27 वर्षे व्हीलचेअरवर असूनसुद्धा जिद्दीच्या जोरावर लढले आणि ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले. प्रत्येक खेळाडूने अशीच आशा ठेवून लढले पाहिजे. आम्हा दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्राने खूप काही दिले आहे. अशाच यशस्वी वाटचालीसाठी आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूंनी पुढे येऊन क्रीडा क्षेत्रात करिअर करावे,'' असे आवाहन "रिओ पॅरा ऑलिंपिक'मधील पदक विजेत्या खेळाडू दीपा मलिक यांनी शनिवारी केले.

"रोटरी क्‍लब ऑफ पुणे विद्यापीठ' आणि "रोटरी क्‍लब ऑफ पुणे नेक्‍स्ट जेन'तर्फे आयोजित "अध्याय 18' या 2018 मध्ये होणाऱ्या परिषदेच्या निमंत्रणाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. "रिओ पॅरा ऑलिंपिक'मध्ये पदक जिंकणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा "रोटरी व्होकेशनल एक्‍सलन्स पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते दीपा मलिक, देवेंद्र झांझरिया, मरियप्पन थंगवेलू आणि वरुण भाटी यांना गौरविले. या वेळी "रोटरी'चे प्रशांत देशमुख, अभय गाडगीळ, आरती राजवाडे आणि विद्याधर सरफरे उपस्थित होते. सुनंदन लेले यांनी खेळाडूंची मुलाखत घेतली.

झांझरिया म्हणाले, 'आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर संघर्ष केला. या संघर्षाने मला लढायला शिकवले. मला कुटुंबापासूनही लांब राहावे लागले. पण, सकारात्मक विचाराने पुढे गेलो की यश मिळतेच. प्रत्येकजण भारतासाठी मेहनत करून पदक घेत आहे याचा अभिमान आहे.''

वरुण आणि मरियप्पन यांनीही खेळाडू बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास उलगडला.

पाटेकर म्हणाले, 'या दिव्यांग खेळाडूंची ऊर्जा पाहून आपल्याला आयुष्यात खूप काही करायचे राहून गेल्याची भावना आहे. मी 45 वर्षे चित्रपटसृष्टीत टिकून आहे. आयुष्य जगताना एक विशिष्ट प्रकारचा माज ठेवला पाहिजे, त्यानुसार जगले पाहिजे.''

चांगली वागणूक मिळाली पाहिजे
'मी अनेक वर्षे महाराष्ट्राकडून खेळले. माझ्या खेळासाठी महाराष्ट्र सरकारने मला शिवछत्रपती पुरस्कारही दिला. पण, असे असूनही मला महाराष्ट्राकडून म्हणावी तशी वागणूक मिळाली नाही, त्यामुळे मला हरियानाकडून खेळावे लागले,'' अशी खंत दीपा मलिक यांनी व्यक्त केली. त्याचे उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले, ""महाराष्ट्राकडून मी मलिक यांची माफी मागतो. येत्या काळात अशा कोणत्याही खेळाडूचा अपमान होणार नाही, अशी ग्वाही देतो. पैसा व योजनांच्या पलीकडे प्रत्येकाला समान वागणूक मिळालीच पाहिजे.''

जवानांसाठी साडेसात कोटी
नाना पाटेकर यांनी जवानांच्या कुटुंबीयांसाठी साडेसात कोटी रुपयांचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती दिली. ते म्हणाले, ""सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी एक उपक्रम हाती घेतला असून, समाजातील दानशूर व्यक्तींकडून मी 7 कोटी रुपये जमा करणार आहे आणि मी स्वतः 50 लाख रुपये या उपक्रमाला देणार आहे. प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना उपक्रमांतर्गत प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्यात येतील.''

Web Title: handicaped sports field carrier