#MondayMotivation : कहाणी सम्राटच्या आयुष्यातील सोनेरी दिवसाची

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सम्राटला कोणते काम दिले हे महत्त्वाचे नाही, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे एका विशेष मुलाला त्यांनी विचार न करता एवढी मोठी संधी देऊन समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. समाजातील सर्व लोकांनी सामाजिक बांधीलकीच्या नात्याने किंवा आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने अशा मुलांना संधी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सीमेवर जाऊन लढूनच सेवा केली पाहिजे असे नाही, तर अशा मुलांना कामाची संधी दिली तर निश्‍चितच एक मोठी मानवसेवा होऊन त्या मुलांनापण समाजात मानाने जगता येईल, अशीही एका विशेष मुलाच्या पालकांची नम्र विनंती आहे. अमित शेट्टी यांचे आम्ही ऋणी आहोत.
- रूपा साळवी,  सम्राटची आई

बालेवाडी - जन्मतः मानसिकदृष्ट्या दिव्यांग असणाऱ्या मुलाच्या काळजीने मातापित्यांना घोर लागलेला असताना एका कनवाळू हॉटेल चालकाने माणुसकीचे दर्शन घडवीत या मुलाला आपल्या हॉटेलमध्ये नोकरी देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. बाणेर येथील सम्राट साळवी या दिव्यांगाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. याच परिसरातील हॉटेल अमृताचे व्यवस्थापक विजयकुमार आणि मालक अमित शेट्टी यांनी या माणुसकीचा परिचय दिला आहे. 

प्रत्येक माता-पित्याला आपले मूल सुदृढ असावे असे वाटत असते, मात्र जर ते मूल शरीराने निरोगी पण मानसिक दिव्यांग म्हणून जन्माला आले, तर जस-जसे मुलाचे वय वाढत जाते तस-तसे पालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलाची शैक्षणिक प्रगती होत नसल्याने किंवा बौद्धिक क्षमता नसल्याने ही मुले शिक्षणात मागे पडतात, त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही, कारण अशा मुलांना समजून घेणे, त्यांच्या कुवतीनुसार त्यांना काम देणे संबंधितांना जमत नाही. असाच मानसिक दिव्यांग मुलगा, सम्राट राजेंद्र रूपा साळवी, याची ही कहाणी आहे. 

सम्राटची आई, रूपा साळवी यांना सम्राटचा तसा खूप अभिमान; मात्र मूल २१ वर्षांचं झालं तेव्हा त्या अभिमानाची जागा काळजीने घ्यावयास सुरवात झाली. सम्राट एका नामांकित संस्थेमध्ये उद्योग केंद्रात जातो; पण किती वर्षं तिथेच काम करत राहणार, अशी काळजी आईला वाटत होती. त्यादृष्टीने बाणेर भागातील प्रत्येक छोट्या-मोठ्या दुकानात, हॉटेलमध्ये त्याला कामावर ठेवा म्हणून त्यांनी विनंती केली; पण परत सम्राटची चेष्टा होत असल्याने आईला दुःख होत असे. तसेच, रूपा यांची सम्राटवरच चिडचिड होत असे. मात्र चिकाटी स्वस्थ बसू देत नव्हती, त्यातून नैराश्‍यही येत होतं; पण प्रयत्न सुरूच होते.  

अशातच एके दिवशी सम्राटच्या आयुष्यातला सोनेरी दिवस उगवला. तो दिवस गुरुवार, ३० ऑक्‍टोबरचा. या दिवशी सम्राटच्या मनात काय विचार आला कोण जाणे? स्वतःहूनच तो या हॉटेलमध्ये गेला आणि व्यवस्थापक विजय कुमार यांना भेटून, मला कामावर ठेवता का, असे विचारून आला. सम्राट घरी येऊन आईकडे पॅन कार्ड, आधार कार्डची झेरॉक्‍स आणि ४ फोटो दे असे म्हणू लागला. म्हणून रूपा साळवी यांनी सम्राटच्या वडिलांना, राजेंद्र साळवी यांना हॉटेलमध्ये विचारण्यासाठी पाठविले. तेव्हा, विजयकुमार यांनी मालकांशी बोलून तुम्हाला उद्या कळवतो, असे सांगितले. मात्र, तासाभरातच त्यांनी सम्राटला घेऊन हॉटेलवर लगेच या असे कळवले. या वेळी हॉटेलचे मालक अमित शेट्टी यांच्याशी बोलणे होऊन सम्राटला कामावर ठेवण्यात आले. सम्राटचे आई- बाबा या हॉटेलमध्ये नेहमीच येत असल्यामुळे सम्राटच्या कुटुंबाविषयी हॉटेल चालकांना माहिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: handicapped samrat salvi lifestyle hotel work humanity motivation