अडचणींच्या त्सुनामीतून तो तरला!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

जलतरणपटू सुयश जाधव याची कहाणी; दोन्ही हात निकामी होऊनही १११ पदकांची कमाई 
बारामती - स्वयंसिद्धा संमेलन संपलं. मात्र, राज्यभरातल्या युवतींच्या मनातून सुयश जाधवची कहाणी काही केल्या जात नव्हती. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून पोहायला शिकलेला; परंतु विजेचा धक्का बसल्याने दोन्ही हात निकामी झालेला, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरची १११ पदके मिळवणारा सुयश सगळ्यांच्याच मनावर राज्य करून गेला. 

जलतरणपटू सुयश जाधव याची कहाणी; दोन्ही हात निकामी होऊनही १११ पदकांची कमाई 
बारामती - स्वयंसिद्धा संमेलन संपलं. मात्र, राज्यभरातल्या युवतींच्या मनातून सुयश जाधवची कहाणी काही केल्या जात नव्हती. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून पोहायला शिकलेला; परंतु विजेचा धक्का बसल्याने दोन्ही हात निकामी झालेला, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरची १११ पदके मिळवणारा सुयश सगळ्यांच्याच मनावर राज्य करून गेला. 

स्वयंसिद्धा संमेलनात सुयश जाधव याने खेळ आणि माझा प्रवास या विषयात आपला जीवनप्रवास सांगितला तेव्हा सभागृहात उपस्थित हजारो जणींच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. या वेळी संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा, उपप्राचार्य आनंद कदम, समन्वयक आर. एस. लोहोकरे उपस्थित होते.

सुयशचा प्रवास, त्याच्या शब्दात... वडील जलतरण क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी वयाच्या दुसऱ्या वर्षीपासूनच मला पोहायला शिकवले आणि पाण्याशी लहानपणीच गट्टी जमली. सतत पोहण्याचा सराव करत मी निष्णात जलतरणपटू बनलो, मात्र बाराव्या वर्षी एका विवाह समारंभात विजेचा धक्का बसला आणि त्यात गंभीर जखमी अवस्थेत सहा महिने दवाखान्यात काढावे लागले. दोन्ही हात निकामी झाल्याने ते कापावे लागले आणि वडिलांनी पाहिलेले राष्ट्रीय जलतरणपटूचे स्वप्न भंगले. मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे व आपणही या स्थितीतून बाहेर यायचे म्हणून कष्टत राहिलो. दोन्ही हात नसतानाही अभ्यास व पोहण्याचा सराव सुरू ठेवला.

दहावी व बारावीच्या परीक्षेत अपंगांच्या यादीत पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावले. फक्त शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर अनेक अडचणींवर मात करीत पोहण्यातही तरबेज झालो. अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करत पोहण्याच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १११ पदके मिळवली.

रशियात खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा आपण आंतरराष्ट्रीय खेळाडू बनू शकलो नाही, मात्र मुलाला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवायचे या स्वप्नात वडिलांनी जमीन विकली. तरीही पैसे कमी पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थिक मदत केली आणि मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊ शकलो.

आई-वडील, शिक्षकांनी मला सामान्य मुलासारखीच वागणूक दिल्याने मी येथपर्यंत पोचलो. म्हणूनच दिव्यांगांकडे अपंग म्हणून पाहू नका, त्यांना मदत करण्यापेक्षा त्यांच्याशी स्पर्धा करा, तुमची मदत त्यांना आणखी अपंग करेल.  
- सुयश जाधव, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू

Web Title: Handicapped Swimmer Suyash Jadhav Award