भावी शिक्षकांच्या हाती शेतीची अवजारे

मीनाक्षी गुरव
रविवार, 23 डिसेंबर 2018

राज्यात शिक्षकांच्या जवळपास 50 हजार जागा रिक्त असतानाही सरकारने 20 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. मात्र, ही प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने शिक्षक होऊ पाहणारे अनेक उमेदवार हवालदिल झाले आहेत. 

- के. एस. ढोमसे, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ 

पुणे : हाती खडू घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भावी शिक्षकांवर राज्य सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे शेतीची अवजारे हाती घेण्याची वेळ आली आहे. जवळपास 20 हजार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करून सहा महिने झाले, तरीही ती पूर्ण झालेली नाही. 

डीएलएड आणि बी.एड होऊनही तीन-चार वर्षांपासून नोकरी नसल्याने शिक्षक होऊ पाहणारे जवळपास दीड लाख उमेदवार आहेत. राज्यात प्रत्यक्षात शिक्षिकांच्या 50 हजारांहून अधिक जागा रिक्त असताना राज्य सरकारने केवळ 20 हजार जागांची भरती प्रक्रिया कासवगतीने सुरू केली आहे. त्यामुळे बेरोजगार भावी शिक्षकांवर पडेल ती कामे करण्याची वेळ आली आहे. अनेक उमेदवार शेतात खुरपणे, ऊस तोडणीची कामेही करत आहेत. 

राज्यात दरवर्षी एक-दीड लाख उमेदवार डीएलएड आणि बी.एडची परीक्षा पास होतात. त्यातील 5 ते 10 हजार उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होतात. एकीकडे शिक्षक होऊ पाहणारे उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील बहुसंख्य शाळा शिक्षकांअभावी ओस पडल्या आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद या शासकीय संस्थांबरोबरच खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये 2010 पासून शिक्षक भरती बंद आहे.

मात्र, उशिरा का होईना सरकारला जून 2018 मध्ये जाग आली आणि शिक्षक भरती प्रक्रियेचा अध्यादेश काढला. त्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले. त्यात जवळपास पावणेदोन लाख डीएलएड व बी.एड धारकांनी नोंदणी केली. तरीही लाखो उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

शिक्षक होण्यासाठी पात्र उमेदवारांची आकडेवारी : 
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 
वर्ष : टीईटी परीक्षा 
वर्ष : पेपर 1 (डीएलएड) - पात्र उमेदवार : पेपर 2 (बी.एड) - पात्र उमेदवार 
2013 : 3,83,630 - 16,285 : 2,35,761 - 14,787 
2014 : 2,60,629 - 25,063 : 1,54,201 - 7,032 
2016 : 1,91,370 - 19,003 : 1,35,460 - 70,086 
2017 : 1,69,950 - 74,045 : 1,27,727 - 29,028 
2018 : 95,787 - 4,030 : 77,662 - 5,647 
---------------------------- 
गेल्या पाच वर्षांत शिक्षक होण्यासाठी पात्र ठरलेले उमेदवार 
डीएलएड : 1,38,426 
बी.एड. : 1,26,580 
------------------------------ 
- एकूण रिक्त जागा : 20 हजार 
- पोर्टलवर नोंद केलेले उमेदवार : एक लाख 78 हजार (अंदाजे) 
---------------------------- 
शिक्षक होऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे स्वप्नं उराशी बाळगून 2016 मध्ये डीएलएड केले. त्यानंतर टीईटी परीक्षेतही उत्तीर्ण झालो. मात्र, शिक्षक भरती बंद असल्यामुळे नोकरी मिळत नाहीये. परिणामी, पोटा-पाण्यासाठी शेजारील गावांमध्ये जाऊन शेतमजुरी करत आहे. 
- आकाश थोरात (नाव बदलले आहे) 
------------------------ 
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांसाठी मंजूर असणारी पदे, कार्यरत आणि रिक्त जागांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर शिक्षकांच्या भरतीसाठी जाहिरात काढणे सोयीचे होणार आहे. शाळांमधील माहिती अद्ययावत झाल्यानंतर भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. 
- मीनाक्षी राऊत, 
प्रभारी उपसंचालक, शिक्षण विभाग 
--------------------------- 

शिक्षक भरतीबाबत सुरू असलेल्या उदासीनतेविषयी आपले मत कळवा.... 
फेसबुक, टविटर, इन्स्टाग्राम 

Web Title: In the hands of future teachers Farmers Equipment