इंदापुरात पाणी आणण्यासाठी असावी लागते मनगटात ताकद

सचिन लोंढे
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको आंदोलनाचं निवेदन दिलं तर तालुक्यात पाणी आलं. यामुळे अशा निष्क्रीय लोकप्रतिनीधीच्या निष्क्रियतेची लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये नोंद होणं गरजेचं असल्याची टिका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केली.

कळस : इंदापूर तालुक्यात ज्याच्या मनगटात ताकद व अंगात पाणी आहे तोच कालव्याला पाणी आणू शकतो. निष्क्रीय माणूस पाणी आणू शकत नाही. आम्ही केवळ रास्तारोको आंदोलनाचं निवेदन दिलं तर तालुक्यात पाणी आलं. यामुळे अशा निष्क्रीय लोकप्रतिनीधीच्या निष्क्रियतेची लिम्का बुक आॅफ रेकाॅर्डमध्ये नोंद होणं गरजेचं असल्याची टिका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केली.

पळसदेव (ता. इंदापूर) येथे पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्याच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, मयूरसिंह पाटील, मंगेश पाटील, हनुमंत बनसुडे, शरद काळे, संतोष काळे, भूषण काळे, माऊली बनकर, लालासाहेब पवार, भरत शहा यांसह तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांच्यावर सडकून टिका केली.

ते पुढे म्हणाले, खडकवासला कालव्याच्या माध्यमातून तालुक्यातील 40 हजार एकर शेतीला पाणी मिळणे नियमानुसार गरजेचे आहे. मात्र गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या चार एकरालाही पाणी मिळाले नाही. 30 कोटी रुपये खर्च करुन कालव्याच्या सणसर कटची निर्मिती करण्यात आली आहे. याव्दारे 3.2 टीएमसी पाणी शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. मात्र त्यातूनही चार वर्षांत एक थेंब पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. मग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाटणीचे 7.2 टीएमसी पाणी गेले कोठे याचा जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागील चार महिन्यांमध्ये खडकवासला, भाटघर धरणं तीनवेळा शंभर टक्के भरली, मग यातून तालुक्याला पाणी का देण्यात आले नाही. कोणत्याही धरणामध्ये तीस टक्के पाणीसाठा झाल्यानंतर आवर्तन सुरू करण्याचा नियम आहे, मग या धरणातून तालुक्याला आवर्तन का देण्यात आले नाही. रस्त्यांची कामे मंजूर करायला आमदार लागतो असे म्हणणाऱ्यांनी कालव्याचे पाणी आणण्यासाठी मग कोण लागतो या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी निरा नदीतून सुमारे 30 हजार क्युसेकने पाणी खाली सोडून देण्यात आले. मग नदीवरील बंधारे का भरण्यात आले नाहीत असाही सवाल शेतकरी उपस्थित करु लागले आहेत. शेजारच्या दौंड तालुक्यातील तलावांमध्ये शेवाळं तयार होईपर्यंत पाणी सोडलं आहे. तर इकडे इंदापूर तालुक्यातील तलावांमध्ये पाणी सोडण्यासाठी नियमावर बोट ठेवण्यात येत आहे. यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याचं जळतं, त्यालाच कळतं या उक्तीप्रमाणे आज तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.

यामुळे हजारो शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता उजनीच्या धरणग्रस्तांसाठी राखीव ठेवलेल्या पाणी कोट्यातून सुमारे 2.5 टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी पळविण्याचा डाव आखण्यात आला आहे. हे पाणी कोणाच्या सांगण्यावरुन कपात करण्यात आले आहे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनीधी सपशेल निष्क्रिय ठरले आहेत. आमच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणाऱ्यांना 2019 मध्ये खरा स्टंट कसा असतो हे समजेल. 

यावेळी खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, पुणे पाटबंधारे विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी तलावात पाणी सोडण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पाठविण्याचे आश्वासन दिले.

तालुक्यातील 70 टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. पुणे पाटबंधारे विभागाच्या निरा डावा कालव्याच्या पणदरे, बारामती व निमगांव केतकी येथील उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय अभियंत्याची पदे रिक्त आहेत. तर पणदरे पासून वडापूरीपर्यंत केवळ दोन पाटकरी आहेत. त्यातील एक रिटायर झाला आहे. खडकवासला पाटबंधारेच्या उपविभागीय अभियंत्यांचे पद रिक्त आहे. शिवाय पाच शाखा कार्यालयात शाखाधाकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. चार नायब तहसीलदारांपैकी केवळ एकच कार्यरत आहे. मग तालुक्यात अधिकारी आणायचे काम कोणाचे आहे. मात्र निष्क्रिय लोकप्रतिनीधींना याबाबत काहीच देणेघेणे नाही.

Web Title: harshawardhan patil criticized on dattatray bharne